Iran-US Conflict: हिंदी महासागरातून एक अत्यंत धक्कादायक आणि आंतरराष्ट्रीय खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. भारतातून इराणला परतणाऱ्या आयआरआयएस देना (IRIS Dena) या इराणी नौदलाच्या ‘मौज-क्लास फ्रिगेट’वर अमेरिकेच्या एका पाणबुडीने शक्तिशाली हल्ला केला आहे. या भीषण हल्ल्यात जहाज समुद्रात बुडाले असून प्राथमिक माहितीनुसार 80 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी या हल्ल्याची माहिती देताना म्हटले आहे की, “दुसऱ्या महायुद्धानंतर शत्रूच्या जहाजावर अमेरिकेने केलेला हा अशा प्रकारचा पहिलाच मोठा हल्ला आहे.”
श्रीलंकेजवळील समुद्रात थरार
हा हल्ला श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीपासून सुमारे 40 नॉटिकल मैल अंतरावर आंतरराष्ट्रीय पाण्यात झाला. इराणची ही युद्धनौका भारतात आयोजित ‘आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू 2026’ मध्ये सहभागी होऊन परतत होती. हल्ल्यानंतर जहाजातून आपत्कालीन सिग्नल (Distress Signal) पाठवण्यात आला, जो श्रीलंकेच्या नौदलाने तात्काळ रोखला. श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या जहाजावर एकूण 180 क्रू मेंबर्स होते. यातील 100 हून अधिक लोक अद्याप बेपत्ता असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, अमेरिकन सैन्याने हिंदी महासागरात इराणी युद्धनौकेवर झालेल्या हल्ल्याचे दृश्ये प्रसिद्ध केली आहेत.
#WATCH | The US military releases the visuals of the attack on an Iranian warship in the Indian Ocean. (Visual Source: Department of War) https://t.co/a5JmdAOUEh pic.twitter.com/IqcqtkhMP6 — ANI (@ANI) March 4, 2026
श्रीलंकेची बचाव मोहीम आणि मृतांचा शोध
घटनेची माहिती मिळताच श्रीलंकेच्या नौदलाने तातडीने बचाव मोहीम हाती घेतली. श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री विजिथा हेराथ यांनी स्पष्ट केले की, ही घटना श्रीलंकेच्या सागरी हद्दीबाहेर घडली असली तरी मानवतेच्या दृष्टीने श्रीलंका मदत करत आहे. बचाव पथकाने आतापर्यंत 32 जणांना समुद्रातून जिवंत बाहेर काढले असून अनेक मृतदेहही हस्तगत केले आहेत. दोन आठवड्यांपूर्वीच भारतीय पूर्व नौदल कमांडने या इराणी जहाजाचे उत्साहात स्वागत केले होते, मात्र परतीच्या प्रवासात या जहाजाचा असा करुण अंत झाला.
हल्ल्याबाबत संभ्रम आणि अमेरिकेची कबुली
सुरुवातीला या हल्ल्यामागे इस्रायलचा हात असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता, मात्र श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी त्याबाबत अनभिज्ञता दर्शवली होती. अखेर अमेरिकेने स्वतः या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अमेरिकेने जाहीर केले आहे की, त्यांच्या पाणबुडीनेच इराणी जहाजाला लक्ष्य केले होते. या घटनेमुळे भारत, श्रीलंका आणि इराणसह जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून हिंदी महासागरात तणाव कमालीचा वाढला आहे.