उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या 11 जागेसह एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राज्यातील राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. विशेषतहा उत्तर प्रदेशातील 10 राज्यसभा जागांसाठी होणारी निवडणूक ही महत्त्वाची मानली जात आहे. विधानसभेतील विद्यमान संख्याबळाचा विचार करता भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीए हे आठ जागा कायम राखण्याच्या स्थितीत असल्याचे सध्याचे राजकीय गणित आहे. समाजवादी पक्षाला दोन जागा मिळण्याची शक्यता असून बहुजन समाज पक्षाकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने त्यांची विद्यमान जागा टिकवणे आव्हानात्मक ठरणार आहे.
मतमोजणीपर्यंत जाणून घ्या संपूर्ण शेड्यूल
निवडणूक आयोग्याच्या कार्यक्रमानुसार उत्तर प्रदेश, उत्तराखंड तसेच पश्चिम बंगालमधील एकून 12 राज्यसभा जागांसाठी येत्या 16 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीची अधिसूचना ही 29 सप्टेंबरला जारी केली जाईल,तर दुसरीकडे अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ही 6 ऑक्टोबर असणार आहे. याच दिवशी उमेदवारी अर्जांची पडताळणी होणार असून 16 ऑक्टोबरला मतदानासोबत मतमोजणी होईल.
उत्तर प्रदेशातील 10 जागांपैकी सध्या भाजपकडे आठ, समाजवादी पक्षाकडे एक, बसपकडे एक जागा आहे. एका राज्यसभा जागेसाठी 37 आमदारांच्या मतांची गरज असल्याचे सांगितले जात आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएकडे सुमारे 294 आमदारांचे संख्याबळ आहे. ज्यामध्ये रघुराज प्रताप सिंह म्हणजेच राजा भैया यांच्या पक्षाच्या दोन आमदारांच्या पाठिंब्याचाही राजकीय समीकरणात उल्लेख केला जात आहे, त्यामुळे भाजपला आठ जागांसाठी आवश्यक संख्याबळ हे उपलब्ध असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे पाहिले तर, समाजवादी पक्षाकडे दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसे संख्याबळ ही असल्याचे दिसून येत आहे.
उत्तराखंडच्या जागेवर कोणाची नजर?
उत्तराखंडमध्ये भाजपचे राज्यसभा खासदार नरेश बन्सल यांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्यामुळे फक्त एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. राज्यातील भाजप सरकारच्या विधानसभा बहुमतामुळेच या जागेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या एका सदस्याच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीमुळे राज्यसभेतील पक्षीय संख्याबळात बदल होण्याचीही मोठी शक्यता आहे.
याच दरम्यान,सर्वच पक्षांचे लक्ष हे आता उमेदवारांच्या निवडीकडे लागले आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार असल्याने भाजपसह अन्य पक्षांकडूनही सामाजिक तसेच राजकीय समीकरणांचा विचार करुन उमेदवार निश्चित केले जाण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने उत्तर प्रदेशातील राजकीय रणनीतीला पुन्हा एकदा वेग येण्याची चिन्हे आहेत.