यंदाच्या नवरात्रीमध्ये जोडीदाराच्या शोधात असणाऱ्यांना भाड्याने जोडीदार घेता येणार आहे. अशी जाहिरात गुजरातमधील एका व्यक्तीने समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली असून ती आता वादात सापडली आहे. गुजरातमधील क्रिश मिस्त्री नावाच्या एका इन्स्टाग्राम वापरकर्त्यांनी ही उपरोधिक जाहिरात प्रसिद्ध केली होती. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘रेंट अ गरबा पार्टनर’ नावाने समाजमाध्यमावर सुरू असलेल्या जाहिरातींची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे बोरिवलीतील आमदार संजय उपाध्याय यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांसह संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. मुंबईत ‘रेंट अ गरबा पार्टनर’ या नावाखाली गरबा कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला-पुरुष, तरुण-तरुणींना एक हजार ते 6,500 रुपये या दरात ‘पार्टनर’ म्हणून उपलब्ध करून देण्यासंदर्भातील जाहिरात अथवा उपक्रम सुरू असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. या जाहिराती आणि उपक्रमाची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नेमकी जाहिरात काय?
नृत्यासाठी जोडीदार शोधणाऱ्यांसाठी ‘सिल्व्हर, गोल्ड आणि प्लॅटिनम’ असे तीन पॅकेजेस आहेत. एक हजार रुपये किमतीच्या ‘सिल्व्हर पॅकेज’मध्ये दोन तासांचा गरबा, पोशाख, मूलभूत नृत्याचे प्रशिक्षण आणि सेल्फी यांचा समावेश आहे. 1500 रुपयांच्या ‘गोल्ड पॅकेज’मध्ये चार तासांचा गरबा, ते दोघे कसे भेटले याबद्दलची एक कहाणी आणि समाज माध्यमावर प्रसिद्ध करता येतील अशा चित्रफितींचा समावेश आहे.
त्यानंतर 2 हजार रुपयांच्या ‘प्लॅटिनम पॅकेज’मध्ये गरबा जोडीदाराचा संपूर्ण अनुभव समाविष्ट आहे. त्यात दिवसभराचा गरबा, कार्यक्रमानंतर कपाळावरचे चुंबन, दुपट्टा-झुमके नीट करण्यासाठी मदत आणि ग्राहकाला त्याच्या घरी सुरक्षित सोडण्याची सोय आहे. ज्यांना नवरात्रीत गरबा, दांडिया खेळण्यासाठी जोडीदार मिळत नाही, त्यांच्यासाठी ही खास सेवा सुरू केल्याचा दावा त्याने केला आहे. “या नवरात्रीत एकटे नाचू नका!” वा ओळीसह “गरबा साथीदार घ्या असे शीर्षक प्रसिद्ध करण्यात आले आहेत.