Aditya Thackeray: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असून काही खासदार पक्षाला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात नवा गदारोळ उठवला आहे. पक्षाचे अनेक खासदार नेतृत्वावर नाराज असून ते बाहेर पडू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर, ठाकरे गटाचे प्रमुख नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी या सर्व चर्चा निव्वळ अफवा असल्याचे सांगत फेटाळून लावल्या आहेत. मात्र, दुसरीकडे सत्ताधारी शिंदे गटाच्या आमदारांनी 'ऑपरेशन टायगर' पूर्ण झाल्याचा दावा केल्याने या प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे.
आदित्य ठाकरेंचे 'अफवांवर उत्तर
खासदार नाराज असल्याच्या चर्चांनंतर आदित्य ठाकरे यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली. आदित्य ठाकरे म्हणाले, "सुरू असलेल्या सर्व चर्चा खोट्या असून नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. काल पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीला सर्व 9 खासदार उपस्थित होते. यातील काही प्रत्यक्ष तर काही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऑनलाईन जोडले गेले होते. पक्षात कोणीही नाराज नसून, जे आमच्यासोबत आहेत त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे."
'चर्चा संपली, सर्व ठरलंय'; शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने यांचा खळबळजनक दावा
आदित्य ठाकरे जरी सर्व आलबेल असल्याचा दावा करत असले, तरी शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने यांनी एक मोठा बॉम्बगोळा टाकला आहे. तुमाने यांच्या दाव्यानुसार, ठाकरे गटातील खासदारांमध्ये प्रचंड असंतोष असून तब्बल 7 खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. "मतदारसंघाच्या विकासासाठी एकनाथ शिंदे यांच्यासारखा कर्तव्यदक्ष नेताच न्याय देऊ शकतो, असा विश्वास या खासदारांना वाटतो आहे. आता कोणतीही प्राथमिक चर्चा सुरू नसून सर्व काही अंतिम झाले आहे. फक्त बंडखोरीची तारीख ठरणे बाकी आहे. लवकरच 'ऑपरेशन टायगर' यशस्वी झाल्याची मोठी बातमी महाराष्ट्राला मिळेल," असे सूत्रांच्या दाव्याला दुजोरा देत तुमाने यांनी म्हटले आहे.
खासदारांच्या नाराजीचे नेमके कारण काय?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटातील खासदारांच्या नाराजीमागे काही महत्त्वाची आणि गंभीर कारणे असल्याचे समोर येत आहे. यातील मुख्य आक्षेप पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या संवाद प्रक्रियेवर आहे; खासदार आणि नेतृत्वात योग्य संवाद होत नसल्याची भावना लोकप्रतिनिधींमध्ये आहे. दुसरीकडे, आपल्या मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांसाठी किंवा वैयक्तिक पातळीवर येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी पक्षाकडून हवी तशी मदत वा पाठबळ मिळत नसल्याची खंतही या खासदारांनी व्यक्त केली आहे.
या अंतर्गत वादामुळे त्रस्त झालेले काही खासदार आता पक्षातून बाहेर पडण्याच्या अंतिम टप्प्यात असल्याचे बोलले जात असून, येत्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.