CM Devendra Fadnavis : कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या नावावरून आणि त्यातील मजकुरावरून सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. या वादाचे पडसाद बुलढाणा जिल्ह्यात उमटले असून, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि आंदोलकांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला. या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत दोन्ही बाजूंना खडे बोल सुनावले आहेत. “1979 मध्ये लिहिलेल्या पुस्तकावरून आज वाद उकरून काढणे हे शुद्ध असामाजिक कृत्य आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर आपली भूमिका मांडली.
नेमका वाद काय?
आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेखावर आक्षेप घेतला होता. यावरून त्यांनी पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याने वादाला तोंड फुटले. याचा निषेध करण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली बुलढाण्यात मोर्चा काढण्यात येणार होता. तसेच, संजय गायकवाड यांच्या घरासमोर या पुस्तकाचे जाहीर वाचन करण्याचा इशारा प्रकाशक प्रशांत आंबी यांनी दिला होता.
बुलढाण्यात तणाव, पोलिसांकडून धरपकड
प्रशांत आंबी मंगळवारी संजय गायकवाड यांच्या घरासमोर जाऊन पुस्तक वाचणार होते, मात्र त्यापूर्वीच बुलढाणा पोलिसांनी त्यांना जिल्ह्याच्या हद्दीत स्थानबद्ध केले. दुसरीकडे, गायकवाड यांच्या घरासमोर मोर्चा काढणाऱ्या आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. या आंदोलनामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तणावपूर्ण शांतता आहे.
मुख्यमंत्र्यांनी टोचले संजय गायकवाडांचे कान
या वादावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही बाजूंवर टीका केली. मुख्यमंत्री म्हणाले की, “छत्रपती शिवरायांचा मान इतका मोठा आहे की कोणीही त्यांचा अपमान करू शकत नाही. हे पुस्तक 1979 मध्ये लिहिले गेले आहे, आज इतक्या वर्षांनी त्यावर वाद उकरून काढणे आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांना भिडणे हे अत्यंत असंवेदनशील कृत्य आहे. आक्षेप घेणाऱ्याने खरंच पुस्तक वाचलंय का? आणि आंदोलन करणाऱ्यांना ते का करत आहेत हे माहित आहे का? केवळ चर्चेत राहण्यासाठी असे निरर्थक वाद निर्माण करणे योग्य नाही.”
चर्चेत राहण्याचा प्रयत्न अयोग्य
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वादाला ‘असामाजिक’ असल्याचे म्हटले आहे. कुठलाही ठोस मुद्दा नसताना केवळ प्रसिद्धीसाठी हा वाद उभा केला जात असल्याचा टोला त्यांनी लगावला. “शिवरायांच्या नावावर अशा प्रकारचे राजकारण करणे दुर्दैवी आहे,” असे म्हणत त्यांनी संजय गायकवाड यांच्या भूमिकेवरही अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे. सध्या पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले असले, तरी या विषयावरून राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापलेले दिसत आहे.