पुणे जिल्ह्यातील खेड तहसील कार्यालयात चौकशीदरम्यान धक्कादायक प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. खेड तहसील कार्यालयात सुनावणी सुरू असताना तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. भ्रष्टाचाराच्या तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदारांसमोर सुनावणी सुरू असताना चाकण मंडळाचे मंडल अधिकारी चेतनकुमार चासकर यांनी तक्रारदाराला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
चाकण मंडळाचे मंडल अधिकारी चेतनकुमार चासकर यांच्या कथित भ्रष्टाचारातून मोठ्या प्रमाणात बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा आरोप करत पुणे जिल्हा भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष मारुती उर्फ बाळासाहेब चौधरी यांनी संबंधित शासकीय समितीकडे तक्रार दाखल केली होती. याच तक्रारीच्या अनुषंगाने खेड तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी प्रशांत बेडसे यांच्या दालनात चौकशी सुरू होती. यावेळी वाद झाल्यानंतर मंडल अधिकारी चासकर यांनी आपल्याला अश्लील शिवीगाळ करत, “तुला खल्लास करतो, तुला बघून घेतो,” अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारदार बाळासाहेब चौधरी यांनी केला आहे.
तसेच, शासकीय दालनातच दमदाटी करण्यात आल्याचा आरोपही तक्रारदाराने केला आहे. दरम्यान, संबंधित मंडल अधिकाऱ्यावर 20 कोटी रुपयांहून अधिक बेकायदेशीर आणि बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या आरोपांची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक असून, संबंधित अधिकाऱ्याची बाजूही अधिकृतपणे समोर येणे महत्त्वाचे आहे.
या संपूर्ण प्रकरणी तक्रारदाराने खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून भारतीय न्याय संहिता तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई आणि FIR दाखल करण्याची मागणी केली आहे. तहसीलदारांच्या दालनातच तक्रारदाराला धमकी दिल्याच्या या आरोपामुळे प्रशासनाच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता या तक्रारीवर पोलीस आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणा कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.