मुंबईतील आयआयटी बॉम्बेमधील विद्यार्थी साहिल वाकोडेच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासाला आता महत्त्वाचे वळण मिळाले आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आयआयटी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, साहिलच्या मृत्यूपूर्वीच्या घटनाक्रमाचा तपास केला जात आहे. परीक्षा केंद्रातील काही दृश्यांमुळे तपास अधिकाऱ्यांसमोर महत्त्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 18 सप्टेंबर रोजी परीक्षा सुरू असताना साहिल परीक्षा हॉलमध्ये होता. दुपारी साडेबारा ते पावणेएक या कालावधीतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले आहे. या फुटेजमध्ये साहिल आपल्या खिशाकडे पाहताना किंवा त्यातून काहीतरी बाहेर काढताना दिसत असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर परीक्षा पर्यवेक्षक प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांनी साहिलशी याबाबत विचारणा केल्याचे दृश्यही तपास यंत्रणेच्या निदर्शनास आले आहे.
परीक्षेची वेळ दुपारी एक वाजता संपणार होती. मात्र, साहिल त्याआधीच परीक्षा केंद्रातून बाहेर पडल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. त्यामुळे परीक्षा हॉलमध्ये नेमकं काय घडलं, साहिलकडे काय होते आणि त्याच्याशी झालेल्या संवादाचे स्वरूप काय होते, याचा तपास गुन्हे शाखेकडून केला जात आहे. या प्रकरणाचा तपास आता सहायक पोलीस आयुक्त धर्मवीर बनसोड यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू आहे. पोलिसांनी आयआयटी कॅम्पसमधील परीक्षा केंद्र, साहिलची वसतिगृहातील खोली आणि इतर संबंधित ठिकाणांची पाहणी केली आहे. त्याचबरोबर उपलब्ध डिजिटल पुरावे आणि सीसीटीव्ही रेकॉर्डिंगचा घटनाक्रम समजून घेण्यासाठी अभ्यास केला जात आहे.
दरम्यान, साहिलच्या वडिलांच्या तक्रारीनंतर प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांच्यासह काही अधिकाऱ्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि जातिवाचक अपमानासह विविध आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या आरोपांची सत्यता अद्याप तपासाधीन आहे.गुन्हे शाखा साहिलच्या पालकांसह संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवत असून, परीक्षा हॉलमध्ये उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांकडूनही माहिती घेतली जात आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे साहिलच्या शेवटच्या काही तासांचा क्रम जोडण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.