छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गंभीर होताना दिसत आहे. शहरातील अनेक भांगात टोळक्याने फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे प्रत्येक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर दुसरीकडे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रस्त्यावरुन ये-जा करत असलेल्या नागरिकांवर या कुत्र्यांकडून हल्ले होण्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घडत आहेत. संपूर्ण प्रकार हे घाटी रुग्णालयातील रुग्णसंख्य वरून स्पष्ट होत आहे.
अवघ्या 22 दिवसांत 585 नागरिक जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, 22 सप्टेंबरपर्यंत फक्त 22 दिवसांत तब्बल 585 जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने घाटी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहे. ज्यामध्ये 444 पुरुष आणि 141 महिलांचा समावेश आहे. म्हणजेच या संपूर्ण दिवसात दररोज सरासरी 23 नागरिक हे कुत्र्यांच्या चाव्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्याचे समोर आलेले आहे.
शहरातील मोकाट कुत्र्यांच्या हल्लांपासून लहान मुले,महिला आणि ज्येष्ठ नागरिकही सुरक्षित नसल्याचे चित्र समोर आलं आहे. विशेष म्हणजे पहाटेच्या वेळी कामानिमित्ताना घराबाहेर पडणारे नागरिक,वृत्तपत्र विक्रेते आणि अन्य कामगारांनाही या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे.
शहरातील गल्लीबोळ,रस्ते, वसातही आणि रहिवासी परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्री फिरताना दिसत आहे. अनेक ठिकाणी पाहिलं तर ही कुत्री टोळक्याने फिरत असल्याचे नागरिकांना रस्त्यावरुन जातानाही सावधगिरी बाळगावी लागतेय. अचानक होणाऱ्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये देखील असुरक्षिततेची भावना वाढत आहे. दिवसेंदिवस वाढत असलेला मोकाट कुत्र्यांचा त्रास लक्षात घेता, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.