Lin Laishram Pregnancy: अभिनेता रणदीप हुडा आणि त्याची पत्नी लिन लैशराम त्यांच्या वैवाहिक जीवनातील आणखी एक खास टप्पा साजरा करत आहेत. त्यांच्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त रणदीपने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या छायाचित्रासोबत त्याने दोघे लवकरच पालक होणार असल्याची घोषणा केली. रणदीपच्या या खुलाशानंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सोशल मीडियावर शेअर केली गुड न्यूज
रणदीपने शेअर केलेल्या फोटोत तो आणि लिन जंगलात शेकोटीजवळ बसलेले दिसतात. हातात हात घालून एकमेकांकडे हसत पाहणाऱ्या या जोडप्याचा फोटो चाहत्यांच्या मनाला भावला. कॅप्शनमध्ये अभिनेत्याने लिहिले, “प्रेम आणि साहसाची दोन वर्षे, आणि आता एक लहान मुलाच्या मार्गावर आहे.” त्यासोबत त्याने हृदयाचा इमोजीही दिला. काही क्षणातच ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली.
लिन लैशराम कोण?
रणदीप हुडाने 29 नोव्हेंबर 2023 रोजी मणिपूरमधील इम्फाळ येथे मेईतेई परंपरेनुसार लिन लैशरामशी लग्न केले. त्यानंतर मुंबईत त्यांच्या विवाहाचे रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते. लिन ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री असून तिचे पदार्पण शाहरुख खानच्या “ओम शांती ओम” मधून झाले. ती “जाने जान” (2023), “मेरी कोम” यांसारख्या चित्रपटांमध्येही झळकली आहे. अभिनयासोबतच लिन ही मॉडेलिंग आणि व्यवसाय क्षेत्रातही सक्रिय आहे.
हेही वाचा – Kiara Advani – Siddharth Malhotra : कियारा- सिद्धार्थनं जाहीर केलं लेकीचं नाव; नावाचा अर्थही आहे खास
रणदीप हुडाचा वर्कफ्रंट
रणदीप सध्या व्यावसायिक कामांमध्येही व्यस्त आहे. त्याचा शेवटचा चित्रपट “जाट” (2025) होता, ज्यात तो सनी देओलसोबत नकारात्मक भूमिकेत दिसला. पुढील वर्षी म्हणजेच 2026 मध्ये तो “मॅचबॉक्स” या इंग्रजी चित्रपटात प्रमुख भूमिकेसह प्रेक्षकांसमोर येणार आहे. रणदीप आणि लिन यांच्या आयुष्यातील नव्या पर्वाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि आनंद दोन्हीही दिसत असून, त्यांच्या या पोस्टनंतर बॉलिवूडमधूनही शुभेच्छांचा ओघ सुरू झाला आहे.