IndiGo Offer: भारतीय हवाई क्षेत्रातील आघाडीची विमान कंपनी इंडिगोने आपल्या यशस्वी प्रवासाची 20 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद ग्राहकांसोबत साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या खास 20 व्या वर्धापनदिनानिमित्त कंपनीने 'हॅपी इंडीगो डे' नावाची एक आकर्षक योजना आणली आहे. या उपक्रमांतर्गत तब्बल 20 हजार लकी प्रवाशांना त्यांचे तिकीट भाडे परत करून मोफत प्रवासाची संधी दिली जात आहे.
प्रति PNR 10 हजार रुपयांपर्यंतचा परतावा; असा घ्या योजनेचा लाभ
कंपनीच्या नियमांनुसार, निवडक प्रवाशांना प्रत्येक PNR वर जास्तीत जास्त 10,000 रुपयांपर्यंतचे रिफंड दिले जाणार आहे. ही सवलत मिळवण्यासाठी 4 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट दरम्यान तिकीट बुक करणे अनिवार्य आहे. प्रवाशांनी इंडिगोच्या अधिकृत संकेतस्थळावरून, मोबाईल ॲपवरून किंवा '6Eskai' या एआय असिस्टंटद्वारे बुकिंग करणे गरजेचे आहे. ही ऑफर केवळ देशांतर्गत प्रवासासाठीच्या इकॉनॉमी आणि इंडिगोस्ट्रेच श्रेणीतील बुकिंगवरच लागू असेल.
लकी ड्रॉ आणि सोपा प्रश्न; जाणून घ्या रिफंड मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया
या योजनेत सहभागी होण्यासाठी वेगळा कोणताही फॉर्म भरण्याची गरज नाही. 3 दिवसांच्या कालावधीत झालेल्या सर्व वैध बुकिंगचा लकी ड्रॉमध्ये आपोआप समावेश केला जाईल. निवडलेल्या 20,000 ग्राहकांना ईमेल अथवा व्हॉट्सॲपवर एक सोपा प्रश्न पाठवला जाईल. या प्रश्नाचे बरोबर उत्तर देण्यासाठी प्रवाशांना 3 संधी मिळतील. अचूक उत्तर देणाऱ्या विजेत्यांच्या बँक खात्यात पुढील 3 ते 5 दिवसांत तिकिटाची रक्कम जमा केली जाईल.
2200 उड्डाणे अन् 12 कोटींहून अधिक प्रवासी; इंडिगोचा 20 वर्षांचा दैदिप्यमान प्रवास
ऑगस्ट 2006 मध्ये अवघ्या 1 विमानाने प्रवास सुरू करणाऱ्या इंडिगोकडे आज 430 पेक्षा जास्त विमानांचा भलामोठा ताफा आहे. दररोज सुमारे 2,200 पेक्षा जास्त फेऱ्या मारत ही कंपनी देशातील 95 हून अधिक आणि परदेशातील 40 हून अधिक शहरांना जोडते. आर्थिक वर्ष 2026 मध्ये इंडिगोने 12.3 कोटींहून अधिक प्रवाशांना सेवा दिली आहे. तसेच स्कायट्रॅक्स (Skytrax) तर्फे 'दक्षिण आशियातील सर्वोत्कृष्ट एअरलाईन' आणि वेळेच्या बाबतीत आशिया-पॅसिफिक क्षेत्रात 6 वे स्थान मिळवून कंपनीने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.