लातूर : लातूर तालुक्याचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी शासनाचे नियम धाब्यावर बसवून लातूर शहरात स्वतःच्या घराच्या टोलेजंग इमारतीचे बांधकाम केल्याप्रकरणी लातूर शहर महापालिका प्रशासनाने 14 दिवसात कागदपत्रे सादर करण्याची नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे. आता रेणापूर नगरपंचायतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा शोभा शाम आकनगिरे यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम केल्याच्या आरोपांवरून त्यांच्या नगरसेवक पदाच्या अपात्रतेबाबत महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मधील कलम 44 अंतर्गत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी 07 दिवसात लेखी खुलासा सादर करण्याची नोटीस बजावली आहे.
शासकीय जमिनीवरील कथित अतिक्रमण भोवणार?
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्रदीप मनोहर माने यांनी त्यांचे वकील ॲड. सुरज साळुंखे यांच्या मार्फत रेणापूर नगरपंचायतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा शोभा शाम आकनगिरे यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मधील कलम 44 अंतर्गत लातूर जिल्हा प्रशासनाकडे लेखी तक्रार केली होती.
या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी नोटीस बजावली असून महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मधील कलम 44 (1)(E) नुसार नगरसेवकाने स्वतः, त्याच्या पती,पत्नीने किंवा अवलंबित व्यक्तीने अनधिकृत बांधकाम केले असल्यास अथवा अशा अनधिकृत बांधकामास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार असल्याचे आढळल्यास, संबंधित नगरसेवकास पदावर राहण्यास अपात्र ठरविण्याची कायदेशीर तरतूद असल्याने रेणापूर नगर पंचायच्या नगराध्यक्षा शोभा आकनगिरे यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या लेखी खुलाशानंतर दि.23 सप्टेंबर, 2026 नंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणती कायदेशीर कारवाई केली जाते, याकडे रेणापूरकरांचे लक्ष लागले आहे. याप्रकरणी नगराध्यक्षा शोभा आकनगिरे यांची प्रतिक्रिया अद्याप समोर आली नसून अधिकृत भूमिका समोर आल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.
रेणापूर नगरपंचायतच्या नगराध्यक्षा शोभा आकनगिरे या भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आल्या असून लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघांचे भाजपा आमदार रमेशअप्पा कराड यांच्या ते कट्टर समर्थक आहेत.त्यामुळे रेणापूरातील शासकीय जमिनीवरील कथित अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामाच्या आरोपांवरून नगराध्यक्षा शोभा आकनगिरे यांच्यावरील आरोप सिद्ध होऊन त्यांचे ‘नगराध्यक्ष’ पद धोक्यात आल्यास आमदार रमेशअप्पा कराड यांना मोठा राजकीय धक्का बसणार असल्याचे रेणापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.