US-Iran War : इराण आणि अमेरिका यांच्यात झालेल्या दोन आठवड्यांच्या युद्धविरामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला इस्रायलने आंतरराष्ट्रीय स्तरावर जोरदार झटका दिला आहे. “आम्ही पाकिस्तानला विश्वासार्ह मध्यस्थ मानत नाही,” अशा स्पष्ट शब्दांत भारतातील इस्रायलचे राजदूत रुवेन अझर यांनी पाकिस्तानची खरी जागा दाखवून दिली आहे. या विधानामुळे जागतिक राजकारणात पाकिस्तानची मोठी नाचक्की झाली आहे.
पाकिस्तानचा दावा आणि इस्रायलचा पलटवार
गेल्या 40 दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-अमेरिका-इस्रायल संघर्षात अखेर बुधवारी दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीची घोषणा झाली. या यशाचे सर्व श्रेय पाकिस्तानचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी घेण्याचा प्रयत्न केला. “जागतिक स्तरावर पाकिस्तान आता एक ‘विश्वसनीय’ मध्यस्थ म्हणून उदयास आला आहे,” असा दावा आसिफ यांनी केला होता. मात्र, इस्रायलने हा दावा फोल ठरवत पाकिस्तानच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
राजदूत रुवेन अझर यांचे रोखठोक विधान
भारतातील इस्रायलचे राजदूत रुवेन अझर यांनी पाकिस्तानच्या भूमिकेवर गंभीर ताशेरे ओढले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, इस्रायल पाकिस्तानला कधीही विश्वासू पक्ष मानत नाही. अझर यांच्या मते, अमेरिकेने कदाचित स्वतःच्या काही विशिष्ट धोरणात्मक कारणांसाठी पाकिस्तानचा वापर केला असावा. त्यांनी पुढे आठवण करून दिली की, अमेरिकेने यापूर्वी हमाससोबतच्या करारासाठी कतार आणि तुर्कीसारख्या वादग्रस्त देशांची मदत घेतली होती. “आम्हाला अपेक्षित असलेल्या निकालांसाठी अमेरिकेशी थेट समन्वय राखणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, पाकिस्तानची मध्यस्थी नाही,” असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
इस्लामाबादमध्ये महत्त्वाची बैठक आणि जेडी व्हान्स यांचा दौरा
युद्धविराम जाहीर झाल्यानंतर आता दीर्घकालीन शांतता करारासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे उप-राष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या नेतृत्वाखालील एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ उद्या पाकिस्तानचा दौरा करणार आहे. इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराणच्या प्रतिनिधींमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा पार पडणार आहे. या बैठकीकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
#WATCH | Delhi: On Pakistan's role as a mediator, Israel's Ambassador to India, Reuven Azar, said, "We don't see Pakistan as a credible player. I think that the United States has decided to use the services of the facilitation of Pakistan for their own reasons. We have seen in… pic.twitter.com/UErWPsTzzH — ANI (@ANI) April 8, 2026
‘स्वयंघोषित’ विजयामुळे पाकिस्तानची नाचक्की
एकीकडे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ या शस्त्रसंधीला आपल्या मुत्सद्देगिरीचे मोठे यश मानत असताना, दुसरीकडे इस्रायलच्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तानचा हा विजय ‘स्वयंघोषित’ ठरला आहे. इस्रायलने पाकिस्तानला मध्यस्थ म्हणून नाकारल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, त्यांची मुत्सद्दी खेळी उलटल्याचे चित्र दिसत आहे.