भुसावळ एमआयडीसी परिसरातील NRJ Pharmachem Pvt. Ltd. कंपनीला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. कंपनीच्या परिसरातून अचानक धुराचे मोठे लोट आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. ही घटना मध्यरात्री घडली असून पोलीस कंट्रोल रूमवरून अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळाली.
यावेळी अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी पोहोचताच आग मोठ्या प्रमाणात भडकलेली दिसून आली. यावेळी दोन गायी मृतावस्थेत आढळून आल्या. आगीची तीव्रता लक्षात घेता जळगाव, भुसावळ, वरणगाव, दीपनगर आणि वरणगाव फॅक्टरी येथील अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचत युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरू केले. कंपनीच्या परिसरात आग आणखी पसरू नये, यासाठी विविध ठिकाणांहून पाण्याचा मारा करण्यात आला.
अनेक तासांच्या संयुक्त प्रयत्नांनंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. यावेळी शॉर्टसर्किट, यंत्रसामग्रीतील बिघाड किंवा अन्य कारणामुळे आग लागली का, याचा तपास केला जात आहे. आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा तपशील अधिक तपासानंतर स्पष्ट होणार आहे. तसेच आगीमुळे कंपनीतील नेमक्या कोणत्या भागाचे आणि किती प्रमाणात नुकसान झाले, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान मध्यरात्रीच्या वेळी ही घटना घडल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.