Pakistan Karachi HIV Outbreak: शेजारील पाकिस्तान सध्या एका अत्यंत गंभीर आरोग्य आणीबाणीच्या छायेत सापडला असून सिंध प्रांताची राजधानी कराची येथे एचआयव्ही संसर्गाचा धक्कादायक उद्रेक झाला आहे. शहरातील कुलसूम बाई वालिका रुग्णालयाशी संबंधित तपासणीदरम्यान तब्बल 130 हून अधिक नागरिकांची एचआयव्ही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या रुग्णांमध्ये सर्वाधिक प्रमाण लहान मुलांचे असल्याने संपूर्ण पाकिस्तानात मोठी घबराट पसरली आहे. सिंध प्रांताचे कामगार मंत्री सईद घानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाधित परिसरातील सुमारे 10000 हून अधिक लोकांची वैद्यकीय तपासणी केली असता 120 जण बाधित आढळले, तर लांधी भागात आणखी 10 जणांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले. या संसर्गाची पहिली नोंद नोव्हेंबर 2025 मध्ये झाली होती.
रुग्णालयातील गंभीर निष्काळजीपणा आणि सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली
सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी 14 जुलै रोजी चौकशी अहवालाचा हवाला देत रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटींवर प्रकाश टाकला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संसर्ग प्रतिबंधक नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे हा भयानक उद्रेक झाल्याचे स्पष्ट झाले आहे:
– एकाच वापरासाठी असलेली सुया आणि इंजेक्शने नष्ट करण्याबाबत कमालीचा निष्काळजीपणा दाखवण्यात आला.
– वापरलेली वैद्यकीय उपकरणे निर्जंतुक करणारे 'ऑटोक्लेव्ह' यंत्र योग्य स्थितीत नव्हते.
– परिचारिका आणि शस्त्रक्रिया विभागातील कर्मचाऱ्यांना संसर्ग नियंत्रणाचे कोणतेही औपचारिक प्रशिक्षण दिले गेले नव्हते.
– वैद्यकीय कचऱ्याचे योग्य वर्गीकरण न करता खासगी अप्रशिक्षित कंत्राटदारांमार्फत विल्हेवाट लावली जात होती.
बाधित बालकांसाठी 2 अब्ज रुपयांचा निधी; दोषी डॉक्टरांवर बडतर्फीची कारवाई
कराचीतील हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर पाकिस्तान सरकारने बाधितांवर उपचारासाठी आणि दोषींवर कारवाईसाठी पावले उचलली आहेत. बाधित मुलांवर इंडस रुग्णालय, आगा खान रुग्णालय आणि दाऊ युनिव्हर्सिटी यांसारख्या 5 प्रमुख वैद्यकीय संस्थांमध्ये मोफत उपचार सुरू करण्यात आले आहेत. दीर्घकालीन उपचारांसाठी सरकारने 2 अब्ज पाकिस्तानी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला असून त्यावर देखरेख ठेवण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची स्थायी समिती स्थापन केली जात आहे. या निष्काळजीपणाला जबाबदार असलेल्या डॉक्टरांवर गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ इशारा देण्यात आला आहे, तसेच सध्या 37 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
हेही वाचा – Indus Water Treaty: 'पाणी हवे असेल तर आधी…'; सिंधू करारावरून भारताचा पाकिस्तानला थेट इशारा
पाकिस्तानच्या कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेमुळे संसर्गात 200 टक्क्यांची वाढ
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या इशाऱ्यानुसार पाकिस्तानात एचआयव्हीचे संक्रमण जगात सर्वाधिक वेगाने वाढत आहे. 2010 मध्ये पाकिस्तानात एचआयव्हीचे 16000 रुग्ण होते, जे 2024 पर्यंत वाढून 48000 वर पोहोचले आहेत; म्हणजेच संसर्गात तब्बल 200 टक्क्यांची वाढ झाली आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, देशात सध्या सुमारे 35000 लोक या संसर्गासह जगत आहेत, परंतु त्यातील 80 टक्के लोकांना याची पुसटशी कल्पनाही नाही. लहान मुलांमधील परिस्थिती तर अधिक भयानक आहे. 14 वर्षांखालील बाधित मुलांची संख्या 2010 मधील 530 वरून 2023 मध्ये 1800 वर पोहोचली आहे, ज्यातील केवळ 38 टक्के मुलांनाच योग्य उपचार मिळत आहेत.
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून शस्त्रक्रियेपूर्वी चाचणी अनिवार्य; तज्ज्ञांचा सुरक्षेवर भर
संसर्गाची ही सर्व प्रकरणे ऑक्टोबर 2025 पूर्वीची असली तरीही सध्या सिंध प्रांतात व्यापक चाचणी मोहीम राबवली जात आहे. या भीषण परिस्थितीची गंभीर दखल घेत पाकिस्तानचे केंद्रीय आरोग्यमंत्री मुस्तफा कमाल यांनी देशभरातील सर्व रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रियेपूर्वी एचआयव्ही चाचणी अनिवार्य करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आगा खान रुग्णालयातील संसर्गजन्य रोग विभागाचे प्राध्यापक डॉ. सय्यद फैसल महमूद यांनी स्पष्ट केले की, हा उद्रेक असुरक्षित इंजेक्शन्स आणि अस्वच्छ वैद्यकीय पद्धतींचा परिणाम आहे. केवळ औषधोपचार पुरेसे नसून वैद्यकीय क्षेत्रात सुरक्षित आणि निर्जंतुक पद्धतींचा काटेकोर वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.