Indian Currency in Nepal : नेपाळ सरकारने सुमारे 10 वर्षांनंतर एक ऐतिहासिक निर्णय घेत भारतीय चलनावरील निर्बंध शिथिल केले आहेत, ज्यामुळे आता तिथल्या बाजारपेठेत 200 आणि 500 रुपयांच्या भारतीय नोटा पुन्हा चलनात येणार आहेत. कॅबिनेटने घेतलेल्या या नवीन निर्णयानुसार, कोणताही भारतीय किंवा नेपाळी नागरिक आपल्याकडे जास्तीत जास्त 25,000 रुपयांपर्यंतच्या मोठ्या भारतीय नोटा बाळगू शकतो. ही मर्यादा ओलांडल्यास मात्र कारवाई होऊ शकते, परंतु ठराविक मर्यादेत पैसे ठेवणे आता पूर्णपणे कायदेशीर आहे. भारत आणि नेपाळ दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या हजारो पर्यटक, कामगार आणि व्यापाऱ्यांसाठी हा निर्णय अत्यंत दिलासादायक ठरला आहे.
जुने निर्बंध आणि मजुरांच्या अडचणी
भारतीय रिझर्व्ह बँकेने विदेशी चलन व्यवस्थापन नियमावलीत केलेल्या बदलांशी सुसंगत राहण्यासाठी नेपाळने हे जुने प्रतिबंध हटवले आहेत. सन 2016 मधील नोटाबंदीनंतर नेपाळमध्ये 100 रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या नोटांवर कडक बंदी घालण्यात आली होती, ज्याचा मोठा फटका भारतात काम करणाऱ्या नेपाळी मजुरांना बसत होता. त्यांना आपली कमाई 100 रुपयांपेक्षा कमी रकमेच्या नोटांच्या स्वरूपात घरी न्यावी लागत असे. ज्यामुळे मोठी रक्कम असल्यास ती 100 रुपयांपेक्षा कमी रकमेच्या नोटांच्या स्वरुपात बाळगणे जोखमीचे होते. चोरी होण्याचा किंवा पैसे गहाळ होण्याचा धोका जास्त असायचा. अनेक भारतीय पर्यटक देखील नियमांच्या माहितीअभावी अनवधानाने मोठ्या नोटा सोबत ठेवायचे आणि त्यांना दंड किंवा कायदेशीर कचाट्यात अडकावे लागत असे. मात्र, आता या समस्या सुटणार आहेत.
हेही वाचा – SEBI Mutual Fund New Rules : SEBI चा मोठा निर्णय, म्युच्युअल फंडाच्या नियमात बदल, गुंतणूकदारांना किती फायदा?
पर्यटन आणि स्थानिक व्यापाराला मिळणार चालना
मोठ्या jरकमेच्या नोटांना परवानगी मिळाल्यामुळे नेपाळमधील हॉटेल, कॅसिनो आणि सीमावर्ती भागातील बाजारपेठांमधील उलाढाल वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वी भारतीय पर्यटक पैसे खर्च करताना मर्यादित चलनाच्या उपलब्धतेमुळे हात आखडता घेत होते, ज्याचा थेट परिणाम नेपाळच्या पर्यटन अर्थव्यवस्थेवर होत होता. आता 200 आणि 500 च्या नोटा सहज स्वीकारल्या जाणार असल्याने विनिमयाची प्रक्रिया सोपी होईल. व्यापाऱ्यांच्या मते, या निर्णयामुळे व्यवहारांमधील पारदर्शकता वाढेल आणि पर्यटकांना अधिक सुविधा मिळेल, ज्यामुळे भारत-नेपाळमधील व्यावसायिक संबंध अधिक दृढ होतील.
भारतीय रुपयाचे नेपाळमधील मूल्य आणि विनिमय दर
भारतीय रुपयाचे मूल्य नेपाळी चलनाच्या तुलनेत अधिक असून 1 भारतीय रुपया हा साधारणपणे 1.60 नेपाळी रुपयांच्या बरोबरीचा मानला जातो. या हिशोबानुसार, 100 भारतीय रुपयांची किंमत नेपाळमध्ये 160 रुपये होते, तर 200 रुपयांच्या एका नोटेचे मूल्य सुमारे 320 नेपाळी रुपये इतके भरते. त्याचप्रमाणे, 500 रुपयांच्या भारतीय नोटेच्या बदल्यात नेपाळमध्ये 800 नेपाळी रुपये मिळतात. मात्र, बँका किंवा अधिकृत विनिमय केंद्रांकडून पैसे बदलताना काही सेवा शुल्क कापले जाते, ज्यामुळे प्रत्यक्ष व्यवहारात 500 रुपयांच्या बदल्यात साधारणपणे 780 ते 795 नेपाळी रुपये ग्राहकांच्या हातात मिळतात.