Indian LPG Tankers Jag Vasant and Pine Gas Crossed Strait of Hormuz: मध्य पूर्वेतील युद्धाच्या भडक्यामुळे भारतात निर्माण झालेल्या एलपीजी (LPG) टंचाईच्या पार्श्वभूमीवर एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. 'जग वसंत' आणि 'पाइन गॅस' हे भारताचे दोन मोठे गॅस टँकर्स होर्मूझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) यशस्वीरित्या पार करून सुरक्षित मार्गावर आले आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून हे दोन्ही जहाजं खाडी क्षेत्रात अडकून पडली होती. त्यांना बाहेर काढण्यात भारताला मोठे राजनैतिक यश मिळाले आहे.
इराणी नौदलाचे संरक्षण आणि सुरक्षित मार्ग
अहवालानुसार, 'जग वसंत' आणि 'पाइन गॅस' या जहाजांनी इराणने निश्चित केलेल्या सुरक्षित सागरी मार्गाचा अवलंब केला. सोमवारी सकाळी हे टँकर्स युएईच्या किनाऱ्यावरून उत्तरेकडे इराणच्या 'लारक' आणि 'क्वेशम' बेटांच्या दिशेने रवाना झाले. प्रवासादरम्यान आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यासाठी दोन्ही जहाजांनी ट्रान्सपॉन्डरद्वारे आपली 'भारतीय ओळख' सतत प्रसारित केली. भारत आणि इराणमधील विशेष करारानुसार, इराणच्या नौदलाने या भारतीय जहाजांना एस्कॉर्ट (संरक्षण) पुरवले, जे भारताच्या तटस्थ परराष्ट्र धोरणाचे यश मानले जात आहे.
अनेक आठवड्यांपासून खाडीत होते अडकलेले
ही दोन्ही जहाजं युद्ध सुरू होण्यापूर्वीच खाडी क्षेत्रात दाखल झाली होती. 'जग वसंत'ने 26 फेब्रुवारी रोजी होर्मूझमार्गे प्रवेश केला होता आणि 28 फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू होण्याच्या काही तास आधी कुवेतवरून LPG लोड केला होता. त्याचप्रमाणे 'पाइन गॅस'ने युएईच्या 'रुवैस' येथून आपला माल भरला होता. मात्र, 28 फेब्रुवारीनंतर होर्मूझचा मार्ग बंद झाल्यामुळे हे टँकर्स तिथेच अडकले होते. अनेक आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर हे टँकर्स भारताच्या दिशेने रवाना झाले आहेत.
भारतातील गॅस टंचाई संपणार का?
या दोन जहाजांच्या आगमनामुळे दिलासा मिळाला असला तरी, तज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. सेंटोसा शिपब्रोकर्सचे एमडी शिव सम्राट कपूर यांच्या मते, आतापर्यंत भारतात आलेले आणि येत असलेल्या एकूण 4 जहाजांमधील गॅसचा साठा भारताची केवळ 2 ते 3 दिवसांची गरज भागवण्यासाठी पुरेसा आहे. त्यामुळे टंचाई पूर्णपणे संपवण्यासाठी देशाला अजून मोठ्या साठ्याची आवश्यकता भासणार आहे.
बंदरांवर एलपीजी जहाजांना प्राधान्य
देशांतर्गत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कडक पावले उचलली आहेत. 10 मार्च रोजी मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार, दीनदयाल पोर्ट अथॉरिटीने (कांडला बंदर) सर्व एजंटना LPG वाहून नेणाऱ्या जहाजांना इतर मालवाहू जहाजांच्या तुलनेत सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, घरगुती गॅसचे उत्पादन वाढवण्याच्या सूचनाही तेल कंपन्यांना देण्यात आल्या आहेत, जेणेकरून सर्वसामान्यांना गॅस सिलेंडरसाठी जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही.