स्त्री भ्रूणहत्येसाठी पुन्हा एकदा बीड जिल्ह्याचे नाव समोर आले आहे. बीड जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर घसरला असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात मुलींचा जन्मदर सर्वांत कमी असल्याचा आकडा समोर आला आहे.
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात हजार मुलांमागे केवळ ७६४ मुलींचा जन्म झाला आहे. कोरोना काळात पालकांनी मुलाच्या जन्माचा अट्टाहास केल्यामुळे ही स्थिती उद्भवली असल्याचे ‘पीसीपीएनडीटी’च्या अशासकीय सदस्य डॉ. आशा मिरगे यांनी सांगितले आहे. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हे सत्य उघड केले आहे.
राज्यातील माजी महिला व बालकल्याण विकास मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यात घटलेल्या मुलींच्या जन्मदरावर भाष्य केले आहे. जिल्ह्यात पुन्हा एकदा मुलींच्या जन्मासाठी प्रबोधन, जनजागृतीची गरज असून प्रबोधन आणि जागणर करूया, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे.