T20 World Cup 2026: क्रिकेट विश्वाला हादरवून टाकणारा निकाल समोर आला आहे. झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 23 धावांनी पराभव करत इतिहास रचला आहे. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 2 बाद 169 धावांचे आव्हान ठेवले होते, मात्र प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ निर्धारित ओव्हर्समध्ये 9 बाद 146 धावांपर्यंतच मजल मारू शकला. झिम्बाब्वेचा या स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय आहे.
ब्रायन बेनेटची नाबाद 64 धावांची खेळी
प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेल्या झिम्बाब्वेला ब्रायन बेनेट (नाबाद 64 धावा) आणि तदिवानाशे मारुमानी (35 धावा) यांनी 7.3 षटकांत 61 धावांची दमदार सलामी दिली. बेनेटने 56 चेंडूत 7 चौकार मारून डावाचा पाया रचला. त्यानंतर रायन बर्ल (35 धावा) आणि कर्णधार सिकंदर रझा (नाबाद 25 धावा) यांनी उपयुक्त योगदान दिले. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना सुरुवातीला लय सापडली नाही, ज्याचा फायदा घेत झिम्बाब्वेने 169 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली. विशेष म्हणजे, फिरकीपटू अॅडम झम्पाला 4 षटकांत 31 धावा देऊन एकही बळी मिळवता आला नाही.
मुझाराबानी आणि इव्हान्सचा भेदक मारा
170 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात अत्यंत खराब झाली. ब्लेसिंग मुझाराबानीने दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जोश इंगलिसला (8 धावा) बाद करून धक्का दिला. त्यानंतर कॅमेरॉन ग्रीन आणि टिम डेव्हिड स्वस्तात बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाची अवस्था 4 बाद 29 अशी झाली होती. मॅथ्यू रेनशॉने 65 धावांची झुंजार खेळी केली आणि ग्लेन मॅक्सवेलने 31 धावांचे योगदान दिले, परंतु झिम्बाब्वेच्या अचूक माऱ्यापुढे ते अपुरे पडले.
गोलंदाजीतील रेकॉर्ड आणि ऑस्ट्रेलियाला मोठा फटका
झिम्बाब्वेकडून ब्रॅड इव्हान्सने अफलातून गोलंदाजी करत 5 बळी टिपले, तर ब्लेसिंग मुझाराबानीने 4 बळी घेऊन ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले. पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी कमकुवत दिसली. तसेच, फिल्डिंग दरम्यान मार्कस स्टोइनिस जखमी झाल्याने ऑस्ट्रेलियाला मोठा फटका बसला. 2007 च्या विश्वचषकानंतर पुन्हा एकदा झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारून विश्वचषकात मोठी खळबळ उडवून दिली आहे.