ICC Tournament Changes: विश्वचषकांचे स्वरूप बदलणार; ICC कडून एकदिवसीय आणि टी-20 वर्ल्डकपसाठी ऐतिहासिक बदलांची घोषणा

एडिनबर्ग येथे पार पडलेल्या आयसीसीच्या वार्षिक परिषदेत 'चीफ एक्झिक्युटिव्ह्ज कमिटी'च्या (CEC) शिफारशींनंतर या ऐतिहासिक निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

ICC Tournament Changes: विश्वचषकांचे स्वरूप बदलणार; ICC कडून एकदिवसीय आणि टी-20 वर्ल्डकपसाठी ऐतिहासिक बदलांची घोषणा

ICC Tournament Changes: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) पुरुष टी-20 विश्वचषक आणि एकदिवसीय (ODI) विश्वचषकाच्या रचनेत अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरगामी बदल जाहीर केले आहेत. एडिनबर्ग येथे पार पडलेल्या आयसीसीच्या वार्षिक परिषदेत 'चीफ एक्झिक्युटिव्ह्ज कमिटी'च्या (CEC) शिफारशींनंतर या ऐतिहासिक निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. क्रिकेटमधील चुरस वाढवणे, सामन्यांचा दर्जा उंचावणे आणि जगभरातील चाहत्यांना अधिक रोमांचक अनुभव देणे हा या बदलांमागील मुख्य उद्देश असल्याचे आयसीसीने स्पष्ट केले आहे.

नव्या नियमांनुसार, 14 संघांचा समावेश असलेला एकदिवसीय विश्वचषक आता 3 वेगवेगळ्या टप्प्यांत खेळवला जाईल. यामध्ये सर्वात कमी मानांकन असलेले शेवटचे 3 संघ (संघ 12, 13 आणि 14) सुरुवातीला पहिल्या फेरीत म्हणजेच 'सुपर सिरीज'मध्ये एकमेकांविरुद्ध खेळतील आणि त्यातून केवळ 1 अव्वल संघ मुख्य फेरीत प्रवेश करेल. दुसऱ्या फेरीत उर्वरित 12 संघांची प्रत्येकी 6 संघांच्या 2 गटांत विभागणी केली जाईल. दोन्ही गटांतील अव्वल 3 संघ आणि पुढील 1 सर्वोत्तम मानांकित संघ मिळून एकूण 7 संघ 'सुपर 7' या राउंड-रॉबिन टप्प्यासाठी पात्र ठरतील. या 'सुपर 7' मधील अव्वल 4 संघ थेट उपांत्य फेरीत (सेमीफायनल) पोहोचतील. यामुळे सुरुवातीच्या सामन्यांचे महत्त्व कमालीचे वाढणार आहे.

टी-20 विश्वचषकात आता 'सुपर 8' ऐवजी 'सुपर 10' चा थरार
दुसरीकडे, 2026 च्या टी-20 विश्वचषकातील उदयोन्मुख देशांच्या दमदार कामगिरीची दखल घेत आयसीसीने 20 संघांच्या या स्पर्धेत 'सुपर 8' ऐवजी 'सुपर 10' फेरी आणण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन रचनेनुसार, पहिल्या फेरीत प्रत्येकी 4 संघांचे 5 गट असतील (एकूण 30 सामने). प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ 'सुपर 10' फेरीत प्रवेश करतील, जिथे 5-5 संघांचे 2 गट केले जातील. नॉकआउट फेरीत पोहोचण्यासाठी यात एक मोठा बदल करण्यात आला आहे; 'सुपर 10' मधील दोन्ही गटांतील केवळ अव्वल (नंबर 1) संघच थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहणाऱ्या संघांना उपांत्य फेरीची उर्वरित 2 तिकिटे मिळवण्यासाठी 'क्रॉस-ओव्हर एलिमिनेटर' सामने खेळावे लागतील.

हेही वाचा – INDW vs ENGW: भारताच्या लेकींचा लॉर्ड्सवर पराक्रम! इंग्लंडवर 270 धावांनी ऐतिहासिक विजय; यास्तिका, क्रांती ठरल्या विजयाच्या शिल्पकार

2028 टी-20 विश्वचषकासाठी पात्रता निकष जाहीर
याच बैठकीत आयसीसीने 2028 च्या टी-20 विश्वचषकाची पात्रता प्रक्रियाही निश्चित केली आहे. विशेष परिस्थितीत 2026 च्या स्पर्धेत बांगलादेशच्या जागी ऐनवेळी खेळणाऱ्या स्कॉटलंडला यावेळी युरोपियन प्रादेशिक अंतिम फेरीत थेट प्रवेश देण्यात आला आहे. थेट पात्र न ठरलेले संघ 'जागतिक पात्रता' फेरीत (ग्लोबल क्वालिफायर्स) खेळतील, जिथे प्रादेशिक पात्रता फेरीतून आलेले 8 संघ (आफ्रिका, आशिया, युरोपमधून प्रत्येकी 2 आणि अमेरिका व पूर्व आशिया-पॅसिफिकमधून प्रत्येकी 1) त्यांच्याशी लढतील. या जागतिक पात्रता फेरीतील प्रत्येक प्रदेशातील अव्वल संघ आणि एकूण क्रमवारीतील पुढील 3 सर्वोच्च मानांकित संघ 2028 च्या विश्वचषकासाठी पात्र ठरतील. या सर्व नवीन आराखड्याला आयसीसी बोर्डाने मंजुरी दिली असली, तरी नोव्हेंबरमधील बैठकीत वित्त आणि व्यावसायिक व्यवहार समितीच्या अंतिम पुनरावलोकनानंतर यावर अंतिम मोहोर उमटवली जाईल.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number