India vs Ireland T20: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय टी-20 संघाला आयर्लंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात 34 धावांनी पराभवाचा धक्का बसला. या पराभवासोबतच यजमान आयर्लंडच्या संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या या सुमार कामगिरीनंतर आता प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची मागणी जोरदार सुरू झाली असून, 28 जून रोजी होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यात युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला संधी देण्याची चर्चा रंगली आहे. याच दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी संघ रचनेवर भाष्य करताना, अनुभवी संजू सॅमसनचे टी-20 संघातील स्थान आता सुरक्षित राहिलेले नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे.
संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माने आता सावध राहण्याची गरज
'सोनी स्पोर्ट्स' वाहिनीवर बोलताना संजय मांजरेकर यांनी सांगितले की, युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत असल्याने तो संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. जर सॅमसन आगामी सामन्यांमध्ये अपयशी ठरला, तर निवडकर्ते थेट वैभवचा संघात समावेश करू शकतात. मात्र, केवळ एका खेळाडूच्या येण्याने सामन्याचा निकाल बदलत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्याच्या घडीला सलामीसाठी अभिषेक आणि संजू हेच भारताची पहिली पसंती असल्याचे त्यांनी नमूद केले.
वैभव सूर्यवंशीची आक्रमक शैली; पहिल्या 6 षटकांत वेगवान सुरुवातीची ताकद
वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीचे विश्लेषण करताना संजय मांजरेकर म्हणाले की, वैभवची खेळण्याची शैली बऱ्याच अंशी अभिषेक शर्मासारखीच आहे, किंबहुना तो अभिषेकपेक्षा काही बाबतीत अधिक सरस खेळू शकतो. टी-20 क्रिकेटमध्ये कोणत्याही मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना संघाला पहिल्या 6 षटकांच्या पॉवरप्लेमध्ये वेगवान सुरुवात मिळणे अत्यंत आवश्यक असते आणि त्यानंतरच्या षटकांमध्येही तोच धावांचा वेग कायम राखणे गरजेचे असते, जे वैभव सहज करू शकतो.
हेही वाचा – India vs Ireland T20: आयर्लंडविरुद्ध टीम इंडिया का हरली? सलामीवीर अभिषेक शर्माने सांगितलं पराभवाचं खरं कारण
दुसऱ्या टी-20 सामन्यात वैभव सूर्यवंशी करणार का आंतरराष्ट्रीय पदार्पण?
2026 च्या टी-20 विश्वचषकात (T20 World Cup) 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' ठरलेला संजू सॅमसन पहिल्या सामन्यात साफ अपयशी ठरला आणि अवघ्या 4 चेंडूंत 5 धावा करून बाद झाला. पहिल्या सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापनाने अभिषेक आणि संजू या जोडीवर विश्वास दाखवल्यामुळे वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी मिळाली नव्हती. आता मालिकेतील दुसरा सामना भारतासाठी निर्णायक असल्याने, संजू सॅमसनची जागा घेऊन वैभवला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कॅप मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संघ व्यवस्थापन या युवा खेळाडूला संधी देऊन पुनरागमन करणार का, याकडे आता सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.