Iran-USA War: गेल्या आठ दिवसांपासून इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धाने जगाची झोप उडवली आहे. अमेरिकेने इराणवर 'रशियाकडून गुप्त माहिती' घेतल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर या संघर्षाला सुरुवात झाली. दरम्यान, अमेरिकेचे सैन्य इराणच्या भूमीवर पाऊल ठेवण्याच्या तयारीत असतानाच, इराणने "आमच्या मातृभूमीचा एक इंच तुकडाही शत्रूला मिळणार नाही" असे ठणकावत अमेरिकेला थेट आव्हान दिले आहे.
युद्धाची सद्यस्थिती आणि जागतिक पडसाद
युद्धाच्या या आगीत इराण गेल्या आठ दिवसांपासून एकटाच लढा देत आहे. रशिया, चीन आणि उत्तर कोरिया यांनी अमेरिकेचा निषेध केला असला, तरी प्रत्यक्ष रणांगणात इराणच्या मदतीला कोणीही धावून आलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इस्रायल दौरा संपताच या युद्धाचा भडका उडाला. "आम्ही हल्ला केला नसता तर इराणनेच आमच्यावर हल्ला चढवला असता," असा दावा अमेरिका आणि इस्रायलकडून करण्यात आला आहे. या युद्धात सर्वाधिक नुकसान तेल रिफायनरींचे झाले असून, इराणसह सौदी अरेबिया, कतार आणि कुवेतलाही याचा मोठा फटका बसला आहे.
राजदूत कार्यालयावर हल्ले आणि 'सरेंडर'चा दावा
दरम्यान, शनिवारी रात्री ओस्लो येथील अमेरिकन दूतावासाजवळ मोठा स्फोट झाला, ज्यामुळे दूतावासाच्या इमारतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचवेळी इस्रायलने तेहरानमधील इराणच्या महत्त्वाच्या प्रकल्पांना लक्ष्य करत बॉम्बवर्षाव केला. या सर्व गोंधळात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खळबळजनक दावा केला आहे. "इराणचा पराभव झाला असून त्यांनी माफी मागत शरणागती पत्करली आहे," असे ट्रम्प यांनी जाहीर केले. मात्र, इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी शेजारील देशांना 'भाऊ' म्हणत त्यांची माफी मागितली असली, तरी अमेरिकेसमोर झुकण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
कुवेत विमानतळावर हल्ला
एकीकडे शांततेच्या चर्चा सुरू असतानाच इराणने कुवेतच्या विमानतळावर हल्ला केल्याने तणाव अधिकच वाढला आहे. इराणमध्ये अमेरिकेचे पायदळ उतरण्याच्या शक्यतेने मध्यपूर्वेतील वातावरण कमालीचे तापले असून, हे युद्ध महायुद्धाच्या दिशेने सरकते की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.