MS Dhoni On Retirement: आयपीएल 2026 चा हंगाम 28 मार्चपासून सुरू होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा धोनीचा शेवटचा हंगाम असेल का? हा प्रश्न चर्चेत असतानाच, महेंद्रसिंग धोनीने निवृत्तीच्या चर्चांना आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे. चेन्नईत आयोजित एका कार्यक्रमात धोनीने गमतीने “मी 60 वर्षांपर्यंत खेळण्याचा प्रयत्न करेन” असे म्हटल्याने चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.
‘Roar 26’ कार्यक्रमात रंगला गमतीशीर संवाद
आयपीएलच्या 19 व्या हंगामापूर्वी, चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाने रविवारी (22 मार्च) चेपॉक स्टेडियमवर ‘Roar 26’ या फॅन इव्हेंटचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात दाक्षिणात्य अभिनेता शिवकार्तिकेयन याने धोनीशी संवाद साधला. शिवकार्तिकेयनने धोनीला निवृत्तीचा विचार सोडून अनेक वर्षे खेळत राहण्याची विनंती केली. “तुम्ही वयाच्या 60 व्या वर्षीही खेळू शकता, निवृत्त होऊ नका,” असे शिवकार्तिकेयनने म्हणताच धोनीने हसत उत्तर दिले, “ते थोडे कठीण आहे, पण मी नक्कीच माझा सर्वोत्तम प्रयत्न करेन.”
तंदुरुस्तीबाबत धोनीचे स्पष्ट भाष्य
44 वर्षीय धोनीने आपल्या फिटनेसबाबत चाहत्यांशी संवाद साधताना प्रांजळ कबुली दिली. तो म्हणाला, “माझी तंदुरुस्तीची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे, तरीही मैदानात उतरण्यासाठी मी जिवापाड मेहनत घेत आहे.” धोनीचे हे उत्तर ऐकताच स्टेडियममध्ये उपस्थित हजारो चाहत्यांनी ‘धोनी-धोनी’ असा जयघोष करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. धोनीने जरी हे विधान गमतीने केले असले, तरी त्याच्या खेळण्याबाबतच्या जिद्दीने चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला असला, तरी आयपीएलमध्ये त्याचे वर्चस्व कायम आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईने पाच वेळा आयपीएल चषकावर नाव कोरले आहे. आतापर्यंत त्याने 278 सामन्यांत 5,439 धावा केल्या आहेत. 2024 मध्ये त्याने कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवले असले, तरी संघाचा मुख्य आधारस्तंभ म्हणून तो आजही कायम आहे.
हेही वाचा – IPL 2026: BCCI कधी करणार पूर्ण वेळापत्रक जाहीर? उर्वरित सामन्यांबाबत जाणून घ्या
Wait for it.. #WhistlePodu #Roar26 pic.twitter.com/CjBX6sCEis — Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 22, 2026
2026 हंगामासाठी ‘यलो आर्मी’ सज्ज
गेल्या हंगामात चेन्नईची कामगिरी संमिश्र राहिली होती. मात्र, 28 मार्चपासून सुरू होणाऱ्या नव्या हंगामात ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली आणि धोनीच्या मार्गदर्शनाखाली ‘यलो आर्मी’ पुन्हा एकदा विजेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे. धोनीच्या या नवीन विधानामुळे यंदाचा हंगाम केवळ चेन्नईच्या चाहत्यांसाठीच नव्हे, तर संपूर्ण क्रिकेट विश्वासाठी खास ठरणार आहे.