Hardik Pandya Injury Update: भारतीय क्रिकेट संघ सध्या गुवाहाटीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्याची तयारी करत आहे. मात्र, सर्वांचे लक्ष 30 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत हार्दिक पंड्याच्या सहभागावर आहे. दुखापतग्रस्त असलेल्या पंड्याला बीसीसीआयने पूर्ण बरा होण्यासाठी अधिक वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, तो या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघात दिसणार नाही, पण टी-20 मालिकेत परतण्याची शक्यता आहे.
मूळतः हार्दिक पंड्याला पुढील आठवड्यात सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीत वडोदराकडून मैदानात उतरून क्रिकेटमध्ये पुनरागमन करायचे होते. मात्र वैद्यकीय सल्ल्यानुसार, संघ व्यवस्थापनाने त्याला थेट एकदिवसीय सामन्यात उतरवण्याऐवजी हळूहळू टी-20 सामन्यांमध्ये मैदानात परतण्याचा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समधील वैद्यकीय पथकाने पंड्याच्या पुनर्वसनावर लक्ष ठेवत, त्याच्या शरीरावर ताण न आणता पुनरागमन करावे, अशी शिफारस केली आहे. या बदलामुळे पंड्याला 9 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी तयारीसाठी किमान तीन सामन्यांचा सराव मिळेल. हार्दिक पंड्या सप्टेंबरमध्ये पाकिस्तानविरुद्ध आशिया कप 2025 अंतिम सामन्यात दुखापतीमुळे अनुपस्थित होता. आता त्याचे लक्ष फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकाकडे आहे.