Vaibhav Suryavanshi Viral Video: अंडर-19 आशिया चषक 2025 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतीय संघाचा 191 धावांनी धुव्वा उडवत विजेतेपदावर नाव कोरले आहे. पाकिस्तानने दिलेल्या 347 धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजी पत्त्यांसारखी कोसळली आणि संपूर्ण संघ केवळ 156 धावांत गारद झाला. मात्र, या हाय-व्होल्टेज सामन्यात खेळाडूंच्या कामगिरीपेक्षा त्यांच्यातील शाब्दिक चकमकीची अधिक चर्चा रंगली आहे.
मैदानात वादाची ‘ठिणगी’; वैभव सूर्यवंशी विरुद्ध अली राजा
भारतीय डावाच्या सुरुवातीलाच मैदानात कमालीचा तणाव पाहायला मिळाला. 10 चेंडूत 26 धावांची आक्रमक खेळी करणारा भारताचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी बाद झाल्यावर हा वाद उफाळून आला. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज अली राजाने वैभवला झेलबाद केले. विकेट मिळाल्यानंतर अली राजाने वैभवच्या जवळ जाऊन त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला आणि काही वादग्रस्त टिप्पणी केली.
वैभवचे चोख प्रत्युत्तर
सुरुवातीला शांत असलेल्या वैभवने माघारी परतताना रागाच्या भरात हातवारे करत अली राजाला ‘तुझी जागा माझ्या पायाखाली आहे,’ असे दर्शवले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून क्रिकेट चाहत्यांमध्ये दोन गट पडले आहेत.
हेही वाचा – Rohit Sharma: रोहित शर्मा घेणार होता निवृत्ती? 2023 विश्वचषकानंतरच्या ‘त्या’ निर्णयावर रोहितचा मोठा खुलासा
भारताचा डाव कोलमडला
पाकिस्तानच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजी फोडून काढत 347 धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या 2 षटकांत 30 धावा कुटून आक्रमक सुरुवात केली खरी, पण महत्त्वाचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाल्याने भारताचा पराभव निश्चित झाला. या स्पर्धेत यापूर्वी युएईविरुद्ध 171 धावांची विक्रमी खेळी करणाऱ्या आणि मलेशियाविरुद्ध अर्धशतक ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र तो केवळ 26 धावाच करू शकला.