Sachin Tendulkar Birthday: क्रिकेटच्या देवाचा 53 वा वाढदिवस! सचिन तेंडुलकरचे 7 जागतिक विक्रम जे मोडणं अशक्य

सचिनने आपल्या 24 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत असे काही मैलाचे दगड प्रस्थापित केले आहेत, जे मोडणे कोणत्याही समकालीन किंवा आगामी खेळाडूसाठी केवळ कठीणच नाही तर अशक्यप्राय वाटते.

Sachin Tendulkar Birthday: क्रिकेटच्या देवाचा 53 वा वाढदिवस! सचिन तेंडुलकरचे 7 जागतिक विक्रम जे मोडणं अशक्य

Sachin Tendulkar Birthday: भारतीय क्रिकेटचा मानबिंदू आणि ‘क्रिकेटचा देव’ मानला जाणारा सचिन तेंडुलकर आज आपला 53 वा वाढदिवस साजरा करत आहे. चाहत्यांनी तेंडुलकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनने आपल्या 24 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत असे काही मैलाचे दगड प्रस्थापित केले आहेत, जे मोडणे कोणत्याही समकालीन किंवा आगामी खेळाडूसाठी केवळ कठीणच नाही तर अशक्यप्राय वाटते. विराट कोहलीसारखा दिग्गज खेळाडू त्याच्या पाठोपाठ असला, तरी क्रिकेटच्या बदलत्या स्वरूपामुळे सचिनचे हे 7 किल्ले अभेद्य राहण्याची शक्यता आहे.

1. एकदिवसीय क्रिकेटमधील धावांचा हिमालय
सचिनने 1989 ते 2012 या काळात 463 एकदिवसीय सामने खेळून 18,426 धावांचा डोंगर उभा केला आहे. सध्या सक्रिय खेळाडूंमध्ये विराट कोहली त्याच्या सर्वात जवळ आहे, परंतु तरीही तो सचिनपेक्षा सुमारे 4,000 धावांनी पिछाडीवर आहे. विराट आता मर्यादित स्वरूपात क्रिकेट खेळत असल्याने हा विक्रम मोडणे हे एक दिवास्वप्नच वाटते.

2. सर्वाधिक 664 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव
सचिनने आपल्या कारकिर्दीत एकूण 664 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आजच्या काळात कामाचा ताण (Workload) पाहता खेळाडू लवकर निवृत्ती घेतात. विराट कोहली 559 सामन्यांसह या यादीत आहे, मात्र त्याला सचिनचा विक्रम गाठण्यासाठी अजून 105 सामने खेळावे लागतील, जे त्याच्या सध्याच्या कारकीर्दीच्या टप्प्यावर जवळपास अशक्य आहे.

3. शतकांचे महाशतक (100 शतके)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके झळकावणारा सचिन हा जगातील एकमेव फलंदाज आहे. जरी विराट कोहलीने 85 शतके पूर्ण केली असली, तरी त्याने T-20 आणि कसोटीतून निवृत्ती घेतल्यामुळे केवळ वन-डे सामन्यांच्या जोरावर उरलेली 15 शतके पूर्ण करणे हे अत्यंत आव्हानात्मक काम आहे.

4. 24 वर्षांची प्रदीर्घ आणि ऐतिहासिक कारकीर्द
सचिनने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी पदार्पण केले आणि तो वयाच्या 40 व्या वर्षापर्यंत खेळला. त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द 24 वर्षे आणि 1 दिवस इतकी प्रदीर्घ होती. आधुनिक क्रिकेटमधील शारीरिक फिटनेसची गरज आणि दुखापतींचे प्रमाण पाहता इतका प्रदीर्घ काळ खेळणे कोणत्याही खेळाडूसाठी दुरापास्त आहे.

5. 34 हजार धावांचा जागतिक विक्रम
सचिनने तिन्ही फॉरमॅट मिळून एकूण 34,357 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, जगातील इतर कोणत्याही खेळाडूला आजवर 30,000 धावांचा टप्पाही ओलांडता आलेला नाही. 100 शतकांव्यतिरिक्त त्याने 164 अर्धशतकेही झळकावली आहेत, जे त्याच्या सातत्याची साक्ष देतात.

6. कसोटीतील शतकांचे ‘अर्धशतक’
कसोटी क्रिकेटमध्ये 51 शतके नोंदवणारा सचिन हा एकमेव खेळाडू आहे. सध्या सक्रिय असलेल्या खेळाडूंमध्ये जो रूट (41 शतके) याच्याकडे ही संधी असली, तरी सचिनला मागे टाकण्यासाठी त्याला अजून 11 शतके हवी आहेत. कसोटी क्रिकेटची कमी होत चाललेली संख्या पाहता हा विक्रम अबाधित राहण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा – 2038 Asian Games: नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आशियाई खेळांचा थरार? भारताकडून ऑलिम्पिकनंतर आता 2038 च्या आशियाई खेळांसाठीही दावा

7. सर्वाधिक ‘सामनावीर’ पुरस्कारांचा मानकरी
एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिनने विक्रमी 62 वेळा ‘सामनावीर’ (Player of the Match) पुरस्कार पटकावला आहे. विराट कोहली 45 पुरस्कारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिनचा हा विक्रम मोडण्यासाठी विराटला अजून 18 वेळा हा किताब जिंकावा लागेल, जे त्याच्या मर्यादित सामन्यांच्या उपलब्धतेमुळे कठीण आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number