US Iran Peace Deal: मध्य पूर्वेमध्ये गेल्या फेब्रूवारी महिन्यापासून सुरू असलेला संघर्ष आज अखेर संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या ऐतिहासिक शांतता कराराबाबत एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या दाव्यानुसार, आजच या करारावर स्वाक्षरी केली जाईल आणि त्यानंतर जागतिक व्यापार व वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली 'होर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) तात्काळ खुली करण्यात येईल.
इराण अणुसाहित्य अमेरिकेकडे सुपूर्द करणार
या करारानंतर दोन्ही देशांमधील परिस्थिती सामान्य होताच, इराण आपले अणुसाहित्य सुपूर्द करण्यासाठी अमेरिकेचा दौरा करणार आहे. इराणला आता कोणत्याही प्रकारची अणुशस्त्रे नको आहेत आणि ते भविष्यात निर्मिती, खरेदी किंवा इतर कोणत्याही मार्गाने ती मिळवणार नाहीत, असा ठाम विश्वास डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.
ओबामांच्या करारापेक्षा ट्रम्प यांचा करार अगदी वेगळा
आपल्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रम्प यांनी पूर्वीच्या सरकारांवर कडक शब्दांत टीका केली. ते म्हणाले की, बराक ओबामा यांनी केलेला इराण करार (JCPOA) म्हणजे इराणला अणुशस्त्रे मिळवून देण्याचा एक सोपा आणि थेट मार्ग होता. तो करार जर कायम राहिला असता, तर इराणने 6 वर्षांपूर्वीच अणुबॉम्ब तयार करून त्याचा वापरही केला असता. याउलट, ट्रम्प यांनी ओबामा प्रशासनाने इराणला दिलेल्या अब्जावधी डॉलर्सच्या (ज्यात 1.7 अब्ज डॉलर्स रोख रकमेचा समावेश होता) मदतीचा उल्लेख करत स्पष्ट केले की, या नवीन करारात पैशांची कोणतीही देवाणघेवाण होणार नाही. हा करार इराणला अणुशस्त्रे बाळगण्यापासून पूर्णपणे रोखणारा असेल.
पर्वतातील अणुसाहित्य बाहेर काढून नष्ट करणार; B-2 बॉम्बर्सचा वापर
इराणचा अणुकार्यक्रम पूर्णपणे निकामी करण्यात आल्याचा दावा करत ट्रम्प म्हणाले की, परिस्थिती पूर्णपणे शांत झाल्यावर योग्य वेळी अमेरिकेच्या अत्याधुनिक B-2 बॉम्बर्स आणि कुशल वैमानिकांच्या मदतीने पर्वतांच्या खोलवर लपवून ठेवलेले अणुसाहित्य बाहेर काढले जाईल. त्यानंतर इराण किंवा अमेरिकेत त्याच्यावर प्रक्रिया करून ते कायमचे नष्ट केले जाईल.
पुढील 24 तासांत घडामोडींना वेग
यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही अमेरिका आणि इराणमधील हा शांतता करार पुढील 24 तासांत अंतिम टप्प्यात पोहोचेल, अशी शक्यता वर्तवली होती. आता स्वतः ट्रम्प यांनीही याला दुजोरा दिला असून दोन्ही देश रविवारीच या करारावर स्वाक्षरी करून जगाला मोठा दिलासा देतील, असे संकेत दिले आहेत.