T20 World Cup 2026 : T20 विश्वचषक स्पर्धा 2026 चा थरार आता कळसाला पोहोचला आहे. 8 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम सामन्यापूर्वी संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' या किताबाकडे लागले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) शुक्रवारी (6 मार्च) या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी 8 दिग्गज खेळाडूंची नामांकने जाहीर केली असून, यात एकमेव भारतीय खेळाडूने स्थान मिळवले आहे. तर, स्पर्धेतून गाशा गुंडाळलेल्या पाकिस्तानच्याही एका फलंदाजाचे नाव या यादीत आहे.
यादीतील प्रमुख दावेदार आणि त्यांची कामगिरी
ICC ने जाहीर केलेल्या या नामांकित खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत आपल्या अष्टपैलू आणि फलंदाजीच्या जोरावर चाहत्यांची मने जिंकली आहेत. या यादीतील प्रमुख खेळाडू खालीलप्रमाणे आहेत:
– टीम सेफर्ट (न्यूझीलंड): किवी फलंदाजाने 7 डावांत 274 धावा केल्या आहेत. उपांत्य फेरीतील त्याचे अर्धशतक अत्यंत महत्त्वाचे ठरले.
– संजू सॅमसन (भारत): या यादीतील एकमेव भारतीय खेळाडू. स्पर्धेत उशिरा संधी मिळूनही संजूने आपल्या फलंदाजीने खळबळ उडवून दिली. त्याने 4 डावांत 77.33 च्या सरासरीने 232 धावा कुटल्या आहेत. बाद फेरीतील त्याच्या खेळी निर्णायक ठरल्या.
– साहिबजादा फरहान (पाकिस्तान): पाकिस्तानच्या या सलामीवीराने विराट कोहलीचा एका विश्वचषकात सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढला आहे. त्याने 2 शतकांसह एकूण 383 धावा केल्या आहेत.
– विल जॅक्स (इंग्लंड): इंग्लंडच्या या अष्टपैलू खेळाडूने 226 धावा आणि 9 विकेट्स घेत आपली छाप पाडली. त्याने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत मिसबाह-उल-हकचा विक्रमही मोडला.
इतर खेळाडूंची तगडी फाईट
पुरस्काराच्या शर्यतीत केवळ फलंदाजच नव्हे, तर अष्टपैलू आणि गोलंदाजांनीही आपले स्थान पक्के केले आहे:
– लुंगी एनगिडी (दक्षिण आफ्रिका): दक्षिण आफ्रिकेच्या या वेगवान गोलंदाजाने 7 सामन्यात 12 विकेट्स घेतल्या आहेत. विशेषतः भारताविरुद्ध अवघ्या 15 धावा देऊन त्याने आपली भेदक गोलंदाजी सिद्ध केली.
– एडन मार्कराम (दक्षिण आफ्रिका): दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने 8 डावांत 286 धावा करत आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली.
– शॅडली व्हॅन शाल्कविक (USA): अमेरिकेच्या या गोलंदाजाने सर्वांना थक्क केले आहे. अवघ्या 4 सामन्यांत त्याने 13 विकेट्स घेतल्या असून भारत आणि पाकिस्तानच्या प्रत्येकी 4 फलंदाजांना त्याने तंबूत धाडले.
– रचिन रवींद्र (न्यूझीलंड): या अष्टपैलू खेळाडूने 11 विकेट्स आणि 128 धावांसह आपली उपयुक्तता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
संजू सॅमसनसमोर कडवे आव्हान
संजू सॅमसनसाठी हा किताब जिंकणे सोपे नसेल, कारण साहिबजादा फरहान आणि एडन मार्कराम यांनी धावांचा डोंगर उभा केला आहे. मात्र, बाद फेरीत संजूने दाखवलेली जिद्द आणि त्याची सरासरी पाहता, भारतीय चाहत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शाल्कविकसारख्या नवख्या खेळाडूने 13 विकेट्स घेत या शर्यतीत रंगत आणली आहे. आता 8 मार्चच्या फायनलमध्ये कोणाची कामगिरी सरस ठरते, यावरच 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट'चे नाव निश्चित होणार आहे.