T20 World Cup 2026: भारत आणि श्रीलंकेच्या मैदानांवर रंगणाऱ्या 2026 च्या टी-20 विश्वचषकाचा थरार आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी कोणता संघ बाजी मारणार आणि कोणाच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा असेल, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अशातच एका संघाने आपल्या 15 खेळाडूंची घोषणा केली असून, एका भारतीय वंशाच्या खेळाडूच्या हाती या संघाचे 'कमांड' सोपवून सर्वांना चकित केले आहे. 2026 च्या टी-20 विश्वचषकासाठी ओमानने आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, लुधियाना (पंजाब) येथे जन्मलेल्या भारतीय वंशाच्या जतिंदर सिंगला ओमानच्या कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे.
जतिंदर सिंगचा प्रवास
जतिंदर सिंगचा जन्म पंजाबमधील लुधियाना येथे झाला होता, परंतु लहान वयातच तो ओमानमध्ये स्थायिक झाला. त्याने ओमानसाठी 19 वर्षांखालील क्रिकेट खेळले असून 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. जतिंदर हा ओमानचा टी-20 प्रकारातील सर्वाधिक धावा करणारा आणि सर्वात अनुभवी खेळाडू आहे. 2024 च्या विश्वचषकाला मुकल्यानंतर आता तो 2026 मध्ये संघाचे नेतृत्व करणार आहे.
विनायक शुक्ला उपकर्णधार
ओमान क्रिकेटने या संघात मोठे बदल केले आहेत. यष्टीरक्षक-फलंदाज विनायक शुक्ला यांना उपकर्णधारपद देण्यात आले आहे. मात्र, सर्वांना चकित करणारा निर्णय म्हणजे आशिया कपमध्ये दोन अर्धशतके झळकावणाऱ्या 43 वर्षीय आमिर कलीमला विश्वचषक संघात स्थान देण्यात आलेले नाही.
संघात 5 नवीन चेहरे
आशिया कपच्या तुलनेत ओमानने संघात एकूण 5 बदल केले आहेत. अष्टपैलू वसीम अली, करण सोनावले, जय ओडेदरा आणि वेगवान गोलंदाज शफीक जान व जितेन रामानंदी यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. हे सर्व खेळाडू पात्रता फेरीत उत्कृष्ट कामगिरी करून आले आहेत.
गट 'ब' मध्ये ओमानचा समावेश
विश्वचषकासाठी ओमानचा समावेश 'ब' गटात करण्यात आला आहे. या गटात त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांसारखे तगडे संघ आहेत. ओमानचा या स्पर्धेतील पहिला सामना 9 फेब्रुवारी रोजी झिम्बाब्वे विरुद्ध रंगणार आहे.
2026 विश्वचषकासाठी ओमानचा संघ:
जतिंदर सिंग (कर्णधार), विनायक शुक्ला (उपकर्णधार), मोहम्मद नदीम, शकील अहमद, हम्माद मिर्झा, वसीम अली, करण सोनावाले, फैसल शाह, नदीम खान, सुफयान महमूद, जय ओदेदरा, शफीक जान, आशिष ओदेदरा, जितेन रामानंदी, हसनैन अली शाह.