Sonam Wangchuk Licence Cancelled: लडाखमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर, केंद्र सरकारने सोनम वांगचुक यांच्या स्वयंसेवी संस्थेचा, स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख (SECMOL), FCRA परवाना तात्काळ रद्द केला आहे. लडाखमधील हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले. गृह मंत्रालयाने आदेशात म्हटले आहे की, वांगचुक यांच्या ना-नफा संस्थेने परदेशी निधी नियमांचे वारंवार उल्लंघन केले आहे.
मंत्रालयाच्या अहवालानुसार, वांगचुक यांच्या वैयक्तिक आणि संयुक्त खात्यांमध्ये निधी प्राप्त झाला असून हे FCRA 2010 चे थेट उल्लंघन आहे. 2021 ते 2024 दरम्यान त्यांच्या संस्थेला परदेशातून कोट्यवधी रुपये मिळाले, ज्यामुळे संभाव्य मनी लाँडरिंगबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. कारण काही निधी अज्ञात संस्थांना पाठवला गेला आहे.
गृह मंत्रालयाच्या आदेशात म्हटले आहे, 'सोनम वांगचुक स्वतःला लोकांच्या हिताचे प्रतिनिधी म्हणून सादर करत असताना, आर्थिक गैरव्यवहाराचे रेकॉर्ड वेगळेच दाखवतात. त्यांच्या कृतींमुळे रचनात्मक संवादाला अडथळा निर्माण होण्याचा आणि खऱ्या चिंतांना वैयक्तिक आणि राजकीय फायद्यासाठी वापरण्याचा धोका आहे.'
वांगचुक यांच्या खात्यात परकीय निधी –
केंद्रीय गृह मंत्रालयानुसार, 59 वर्षीय वांगचुक यांचे नऊ वैयक्तिक बँक खाते आहेत, त्यापैकी आठ खात्यांची घोषणा केलेली नाही. या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात परकीय निधी असल्याचे निदर्शनास आले आहे. 2021 ते 2024 दरम्यान, वांगचुक यांनी त्यांच्या वैयक्तिक खात्यांतून सुमारे 2.3 कोटी परदेशात पाठवले आहेत.
हेही वाचा – LEH VIOLENCE: लेहमध्ये हिंसक आंदोलन; राज्यत्वाच्या मागणीवरून तणाव, किमान 3 मृत
दरम्यान, मंत्रालयाने पुढे म्हटलं आहे की, 2018 ते 2024 दरम्यान वेगवेगळ्या खात्यांतून वांगचुक यांना 1.68 कोटीचा परकीय निधी मिळाला. ते कॉर्पोरेट क्षेत्रावर टीका करत असताना, केंद्र सरकारच्या सार्वजनिक उपक्रमांसह विविध कॉर्पोरेट संस्थांकडून CSR अंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी घेत आहेत, असंही गृह मंत्रालयाने आपल्या अहवालात नमूद केलं आहे.