Smriti Mandhana: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर एक अभूतपूर्व इतिहास रचला आहे. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात मैदानात उतरताच स्मृतीने तिच्या कारकिर्दीतील 300 वा आंतरराष्ट्रीय सामना पूर्ण केला. या ऐतिहासिक टप्प्यामुळे जागतिक महिला क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात 300 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विश्वविक्रम आता स्मृतीच्या नावावर नोंदवला गेला आहे. अत्यंत तरुण वयात भारतीय संघाच्या फलंदाजीची धुरा सांभाळणाऱ्या स्मृतीने आपल्या सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर हे मानाचे स्थान मिळवले आहे.
या कामगिरीसह स्मृती मानधनाने जागतिक स्तरावर 300 हून अधिक सामने खेळणाऱ्या 12 व्या महिला खेळाडूचा मान मिळवला आहे. तर भारताकडून हा टप्पा ओलांडणारी ती केवळ तिसरी खेळाडू ठरली आहे. तिच्याआधी भारताच्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी हा पराक्रम केला असून, यामध्ये सध्याची कर्णधार हरमनप्रीत कौर 374 सामन्यांसह अव्वल स्थानावर आहे, तर माजी कर्णधार मिताली राज 333 सामन्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आता स्मृतीदेखील या दिग्गजांच्या पंक्तीत जाऊन बसली आहे.
हा सामना स्मृतीच्या वैयक्तिक विक्रमासोबतच संपूर्ण महिला क्रिकेटसाठी मैलाचा दगड ठरला आहे. इंग्लंडच्या भूमीवर यापूर्वी 19 वेगवेगळ्या मैदानांवर एकूण 55 महिला कसोटी सामने खेळवले गेले आहेत. मात्र, ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर (Mecca of Cricket) महिलांचा कसोटी सामना होण्याची ही संपूर्ण इतिहासातील पहिलीच वेळ आहे. यापूर्वी इंग्लंडमध्ये सर्वाधिक 9 कसोटी सामने वूस्टरशायरच्या 'काउंटी ग्राउंड'वर आणि 6 सामने 'द ओव्हल' मैदानावर खेळले गेले आहेत.
या ऐतिहासिक मैदानावर भारतीय महिला संघाचा इंग्लंडमधील हा 10 वा कसोटी सामना आहे. विशेष म्हणजे, इंग्लंडच्या धरतीवर भारतीय संघाचा कसोटी रेकॉर्ड अत्यंत उत्कृष्ट आणि दबदबा निर्माण करणारा राहिला आहे. यापूर्वी खेळल्या गेलेल्या 9 सामन्यांपैकी भारताने 2 सामन्यांत दिमाखदार विजय मिळवला आहे, तर उर्वरित 7 सामने अनिर्णित (Draw) राहिले आहेत. इंग्लंडमध्ये खेळताना भारतीय महिला संघाने आजवर एकही कसोटी सामना गमावलेला नाही, हा अजिंक्य राहण्याचा पराक्रम या सामन्यातही संघाचे मनोबल उंचावणारा ठरेल.