Rahul Gandhi : ‘हिंमत असेल तर अमेरिकेसोबतची ‘ट्रेड डील’ रद्द करून दाखवा!’ राहुल गांधींचे मोदींना आव्हान

लोकसभेत आपण प्रश्न विचारल्यावर त्याच सायंकाळी पंतप्रधान मोदींनी मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या मंत्र्यांशी चर्चा न करता थेट ट्रम्प यांना फोन करून कराराला संमती दिली, असा आरोप राहुल गांधींनी केला.

Rahul Gandhi : ‘हिंमत असेल तर अमेरिकेसोबतची ‘ट्रेड डील’ रद्द करून दाखवा!’ राहुल गांधींचे मोदींना आव्हान

Rahul Gandhi on Narendra Modi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशातील भोपाळ येथे आयोजित ‘किसान महा-चौपाल’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली आहे. भारत-अमेरिका ट्रेड डील आणि चीनच्या घुसखोरीच्या मुद्द्यावर त्यांनी सरकारला धारेवर धरले. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयाला बेकायदेशीर ठरवल्यानंतर, आता पंतप्रधान मोदींनी हा शेतकरीविरोधी करार रद्द करून दाखवावा, असे थेट आव्हान राहुल गांधी यांनी दिले आहे.

मंत्रिमंडळाला न विचारता ट्रेड डील केल्याचा आरोप
राहुल गांधी यांनी आरोप केला की, भारत आणि अमेरिका यांच्यातील ट्रेड डील कृषी उत्पादनांच्या मुद्द्यावरून 4 महिने रखडली होती. मात्र, लोकसभेत राहुल गांधींनी प्रश्न विचारल्यानंतर त्याच संध्याकाळी पंतप्रधान मोदींनी मंत्रिमंडळातील महत्त्वाचे मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी किंवा शिवराज सिंह चौहान यांच्याशी चर्चा न करता थेट ट्रम्प यांना फोन करून कराराला संमती दिली. “पंतप्रधान मोदींवर अमेरिकेकडून दबाव होता, त्यामुळे त्यांनी घाईघाईने हा करार केला,” असा खळबळजनक दावाही गांधींनी केला. अमेरिकेतील सोयाबीन, कापूस आणि मका भारतीय बाजारपेठेत आल्यास देशातील लहान शेतकऱ्यांचे कंबरडे मोडेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा –  Rahul Gandhi: राहुल गांधी यांच्या विरुद्धच्या खटल्यात काल भिवंडी न्यायालयात नेमकं काय घडलं? वकिलांनी केला खुलासा

चीन घुसखोरी: नरवणेंच्या पुस्तकावरून मोदींवर निशाणा
लडाखमधील चीनच्या घुसखोरीबाबत बोलताना राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ (Four Stars of Destiny) या पुस्तकाचा संदर्भ दिला. “जेव्हा चीनचे टँक भारतीय हद्दीत घुसत होते, तेव्हा लष्करप्रमुखांनी संरक्षणमंत्र्यांना फोन केला, मात्र त्यांना स्पष्ट आदेश मिळाले नाहीत. जेव्हा संरक्षणमंत्र्यांनी पंतप्रधानांना विचारले, तेव्हा त्यांनी लष्करप्रमुखांना एकटे सोडून ‘जे योग्य वाटेल ते करा’ असे सांगितले,” असे राहुल गांधी म्हणाले. संकटाच्या वेळी पंतप्रधान निर्णय घेण्याऐवजी ‘गायब’ झाले होते, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

‘अदानी आणि एपस्टीन फाईल्स’चा संदर्भ
राहुल गांधी यांनी या ट्रेड डीलचा संबंध गौतम अदानी यांच्यावरील अमेरिकेतील खटल्याशी आणि ‘एपस्टीन फाईल्स’शी जोडला. “पंतप्रधान मोदी हे पूर्णपणे तडजोड (Compromised) झालेले आहेत. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांचे टॅरिफ बेकायदेशीर ठरवले असले तरी, मोदी हा करार रद्द करू शकणार नाहीत. कारण त्यांच्यावर बाह्य शक्तींचा दबाव आहे,” असे राहुल गांधी म्हणाले. भारताचा मौल्यवान डेटा आणि शेतकऱ्यांचे हित त्यांनी अमेरिकेच्या दावणीला बांधले असल्याची टीका त्यांनी केली.

हेही वाचा – India US Trade Deal: भारत-अमेरिका व्यापार करार अधांतरी? ट्रम्प यांच्या ‘या’ निर्णयामुळे भारतासाठी डोकेदुखी वाढणार

लोकसभेत आवाज दाबल्याचा दावा
“देशाच्या इतिहासात प्रथमच विरोधी पक्षनेत्याला राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर बोलू दिले गेले नाही,” असा आरोप राहुल गांधी यांनी केला. जेव्हा मी संसदेत लष्करप्रमुखांच्या पुस्तकातील सत्य मांडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सत्ताधारी मंत्र्यांनी गोंधळ घालून मला थांबवले, असा दावा त्यांनी केला. “सत्य समोर येईल या भीतीने पंतप्रधान संसदेतून निघून गेले आणि नंतर खोटा बचाव केला,” असे म्हणत त्यांनी सरकारची कोंडी केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number