Sarthak Ranjan IPL 2026 Auction: भारतात क्रिकेट केवळ खेळ न राहता तरुणांसाठी करिअर घडवणारे व्यासपीठ ठरत आहे. अशाच एका नव्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे, ते म्हणजे सार्थक रंजन. पूर्णियाचे खासदार पप्पू यादव (राजेश रंजन) यांचा मुलगा असलेला सार्थक आयपीएल 2026 च्या मेगा लिलावापूर्वीच चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचे फिटनेस फोटो आणि स्टायलिश लूक सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, 29 वर्षीय सार्थक रंजन दिल्ली क्रिकेट असोसिएशन (DDCA) कडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. तो अष्टपैलू खेळाडू असून उजव्या हाताचा फलंदाज आणि ऑफ स्पिन गोलंदाज आहे. जरी त्याने अद्याप आयपीएल किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नसले, तरी त्याच्या अलीकडील देशांतर्गत कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
डीपीएलमध्ये चमकदार कामगिरी
दिल्ली प्रीमियर लीग (DPL) 2025 मध्ये सार्थक रंजनने अप्रतिम कामगिरी केली. त्याने 9 सामन्यांत एकूण 449 धावा केल्या असून त्याची सरासरी 56.12 आणि स्ट्राइक रेट 146.73 इतका प्रभावी होता. या स्पर्धेत त्याने एक धमाकेदार शतकही झळकावले. आक्रमक फलंदाजी ही त्याची ओळख बनली असून, डीपीएलसारख्या स्पर्धेत मिळालेले यश आयपीएलसाठी दार उघडणारे ठरते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
हेही वाचा – IPL Auction 2026: आयपीएल लिलावात अर्जुन तेंडुलकरचे नाव का घेतले गेले नाही? तो आता कोणत्या संघाकडून खेळणार?
फिटनेस आणि स्टाइलचीही चर्चा
मैदानावरील कामगिरीसोबतच सार्थकचा फिटनेस आणि लूकही चर्चेत आहे. सोशल मीडियावर अनेक जण त्याला 'मॉडेलसारखा क्रिकेटर' म्हणत आहेत. तज्ज्ञांच्या मते, उत्कृष्ट फिटनेस दीर्घकाळ क्रिकेट खेळण्यासाठी महत्त्वाचा ठरतो आणि याच बाबतीत सार्थक इतरांपेक्षा पुढे दिसतो.
आयपीएल 2026 मेगा लिलावात एन्ट्री
आयपीएल 2026 चा मेगा लिलाव आज, 16 डिसेंबर 2025 रोजी होत असून सार्थक रंजनने स्वतःला 30 लाखांच्या बेस प्राइसवर नोंदवले आहे. तो अनकॅप्ड खेळाडू असला तरी त्याचा सध्याचा फॉर्म पाहता बोली वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या कोणत्या संघाने त्याला विकत घेतले आहे की नाही याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
राजकीय ओळखीपलीकडे स्वतःची छाप?
सार्थकचे वडील पप्पू यादव हे देशातील एक प्रसिद्ध राजकारणी असल्याने त्याच्या लिलावातील उपस्थितीने माध्यमांमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र, डीपीएलमधील कामगिरी पाहता तो केवळ राजकीय ओळखीमुळे नाही, तर स्वतःच्या मेहनतीमुळे पुढे येत असल्याचे स्पष्ट होते. आयपीएल लिलावात अनकॅप्ड आणि अष्टपैलू खेळाडूंना मोठी मागणी असते. त्यामुळे सार्थक रंजनला संधी मिळाल्यास, त्याचा हा टप्पा त्याच्या क्रिकेट कारकिर्दीसाठी मैलाचा दगड ठरू शकतो. सध्या सर्वांच्या नजरा लिलावावर आणि या तरुण खेळाडूच्या भविष्यावर खिळल्या आहेत.