Railways Reservation: भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंग प्रणालीतील दलालांचा सुळसुळाट रोखण्यासाठी आणि सर्वसामान्य प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळवून देण्यासाठी एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. सोमवार, 12 जानेवारी 2026 पासून रेल्वे तिकीट बुकिंगच्या वेळेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार आहे. नवीन नियमानुसार, ज्या प्रवाशांचे IRCTC खाते आधार-सत्यापित (Aadhaar-verified) आहे, त्यांना आगाऊ आरक्षण कालावधीच्या (ARP) पहिल्या दिवशी आता सकाळी 8 वाजेपासून चक्क मध्यरात्रीपर्यंत तिकीट बुक करता येणार आहे.
दलालांना बसणार मोठा फटका
रेल्वेने ई-तिकीटिंग प्रणाली अधिक सुरक्षित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवला आहे. यापूर्वी आधार-सत्यापित वापरकर्त्यांना केवळ दुपारी 12 वाजेपर्यंतच तिकीट बुक करण्याची मुभा होती, जी आता वाढवून मध्यरात्रीपर्यंत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आरक्षणाच्या पहिल्या दिवशी केवळ आधार-प्रमाणित प्रवाशांनाच सामान्य आरक्षित तिकिटे बुक करण्याची परवानगी असेल. यामुळे बनावट आयडी वापरून तिकिटे पळवणाऱ्या दलालांना चाप बसणार असून, खऱ्या प्रवाशांना कन्फर्म सीट मिळण्याची शक्यता कैक पटीने वाढणार आहे.
हायटेक देखरेख आणि 57 दशलक्ष खाती बंद
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पारदर्शकता वाढवण्यासाठी आतापर्यंत 57.3 दशलक्ष संशयास्पद आणि निष्क्रिय IRCTC युझर खाती कायमची बंद किंवा निलंबित करण्यात आली आहेत. सर्व्हरच्या समस्यांमुळे सुरुवातीच्या काही तासांत तिकीट बुक न करू शकणाऱ्या प्रवाशांना आता अधिक वेळ मिळणार असल्याने हा मोठा दिलासा मानला जात आहे. दरम्यान, संगणकीकृत PRS काउंटरवरील तिकीट बुकिंग प्रक्रियेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
हेही वाचा – National Data Hackathon : आधारसोबत काम करून जिंका 2 लाखांचे बक्षीस! जाणून घ्या, कसा करायचा अर्ज
दरम्यान, ही प्रणाली रेल्वेची पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे. प्रवाशांना नवीनतम माहितीसाठी नियमितपणे आयआरसीटीसीची अधिकृत वेबसाइट किंवा अॅप तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे. असे बदल प्रवाशांना अधिक सोयीस्कर बनवतात आणि प्रवास नियोजन सोपे करतात. रेल्वे त्यांच्या सेवा सुधारण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे आणि हा बदल त्या प्रयत्नांचा एक भाग आहे. तथापी, नवीन नियमावली केवळ ई-तिकीटिंग (App/Website) साठी लागू आहे.