India-US Trade Deal: भारत आणि अमेरिका दरम्यान झालेल्या ऐतिहासिक व्यापार कराराची सविस्तर रूपरेषा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी जाहीर केली आहे. या करारानुसार, अमेरिकेत निर्यात होणाऱ्या अनेक भारतीय वस्तूंवर आता शून्य टक्के कर लागू होणार आहे. दोन्ही देशांनी शनिवारी रात्री उशिरा संयुक्त निवेदन जारी केल्यानंतर गोयल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरवर्षी 500 अब्ज डॉलर्सचा द्विपक्षीय व्यापार साध्य करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा करार करण्यात आला असून, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हा एक सुवर्ण टप्पा मानला जात आहे.
प्रमुख उत्पादनांना करमुक्त प्रवेश
या करारामुळे भारतातील महत्त्वाच्या निर्यात क्षेत्रांना मोठा बूस्ट मिळणार आहे. प्रामुख्याने रत्ने आणि हिरे, मोठ्या प्रमाणात निर्यात होणारी औषध उत्पादने (Pharmaceuticals) आणि स्मार्टफोन यांच्यावर आता अमेरिकेत शून्य टक्के कर लागेल. यामुळे जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादने अधिक स्पर्धात्मक होतील. “या करारामुळे गुंतवणूकदारांसाठी नवीन संधींची द्वारे उघडली असून त्यांनी त्याचा पूर्ण लाभ घ्यावा,” असे आवाहन मंत्री पियुष गोयल यांनी यावेळी केले.
कृषी आणि फलोत्पादन क्षेत्राची चांदी
कृषी क्षेत्रातही भारताने मोठी सवलत मिळवली आहे. भारतातून अमेरिकेत पाठवल्या जाणाऱ्या मसाले, चहा, कॉफी, नारळ आणि नारळाचे तेल, सुपारी, काजू, चेस्टनट तसेच अनेक फळे आणि भाज्यांवर कोणताही अतिरिक्त किंवा परस्पर कर आकारला जाणार नाही. विशेष म्हणजे, भारताच्या शेजारील आणि इतर स्पर्धक राष्ट्रांच्या तुलनेत भारतासाठी हे शुल्क 18 टक्क्यांनी कमी ठेवण्यात आले आहे, ज्याचा थेट फायदा भारतीय निर्यातदारांना आणि शेतकऱ्यांना होणार आहे.
#WATCH | Delhi | On a question by ANI regarding the status of export of electronic products and components, Union Minister for Commerce and Industry, Piyush Goyal says, "Smartphones to the US will be exported on zero duty under the trade arrangements…" pic.twitter.com/o19dCvScEf — ANI (@ANI) February 7, 2026
शेतकरी आणि दुग्धव्यवसायाचे संरक्षण
व्यापार सवलती देतानाच भारताने आपल्या संवेदनशील क्षेत्रांचे संरक्षणही तितक्याच प्रभावीपणे केले आहे. पियुष गोयल यांनी स्पष्ट केले की, करार करताना भारतीय शेतकरी आणि दुग्ध क्षेत्राचे हित पूर्णपणे जपले गेले आहे. देशांतर्गत बाजारपेठेला हानी पोहोचेल अशा कोणत्याही अटी स्वीकारल्या गेलेल्या नाहीत. उलट, अमेरिकेसारख्या मोठ्या बाजारपेठेत भारतीय कृषी उत्पादनांना शून्य करामुळे मिळणारा प्रवेश हा भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा ठरेल.