MCC New Rules: क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी आहे. क्रिकेटच्या नियमांमध्ये तब्बल 73 बदल करण्यात आले असून, हे सर्व नवे नियम 1 ऑक्टोबर 2026 पासून लागू होणार आहेत. 2022 नंतरचा हा क्रिकेट नियमांमधील सर्वात मोठा बदल मानला जात आहे. मेरिलबोन क्रिकेट क्लब (MCC) ने हे बदल अधिकृतपणे जाहीर केले असून, याचा परिणाम टेस्ट क्रिकेटसह इतर फॉरमॅट्सवरही दिसून येणार आहे.
1. टेस्ट क्रिकेटमधील शेवटच्या ओव्हरचा नियम बदलला
आतापर्यंत टेस्ट सामन्यात दिवसाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये विकेट पडल्यास खेळ थांबवला जात होता आणि नवा फलंदाज पुढील दिवशी येत असे. मात्र, नव्या नियमानुसार शेवटचा ओव्हर कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावा लागेल. विकेट पडल्यास तात्काळ नवा फलंदाज मैदानात उतरवणे बंधनकारक असेल. MCC च्या मते, यामुळे खेळातील थरार वाढेल आणि फलंदाजांना अनुकूल परिस्थितीतून सुटण्याची संधी मिळणार नाही.
2. ओव्हरथ्रो आणि ‘डेड बॉल’ची स्पष्ट व्याख्या
नव्या नियमांनुसार, ओव्हरथ्रो आणि मिसफिल्ड यातील फरक स्पष्ट करण्यात आला आहे. फील्डरने विकेटकडे फेकलेली चेंडू पुढे गेली तरच तो ओव्हरथ्रो मानला जाईल. बाउंड्रीजवळ चेंडू थांबवताना हातातून निसटल्यास तो मिसफिल्ड ठरेल.
तसेच ‘डेड बॉल’ जाहीर करण्यासाठी चेंडू विकेटकीपर किंवा गोलंदाजाकडे असणे आवश्यक नाही. चेंडू कुठल्याही फील्डरकडे स्थिर झाल्यास आणि धाव शक्य नसल्याचे अंपायरला वाटल्यास, तो डेड बॉल घोषित करू शकतो.
3. लेमिनेटेड बॅटला सशर्त मंजुरी
MCC ने लेमिनेटेड (टाइप-डी) बॅटला ओपन एज क्लब क्रिकेटमध्ये वापरण्याची परवानगी दिली आहे. दोन किंवा तीन लाकडी तुकड्यांपासून बनवलेले हे बॅट तुलनेने स्वस्त असून, नवोदित आणि क्लब स्तरावरील खेळाडूंना दिलासा देणारे ठरणार आहेत. मात्र, व्यावसायिक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये याबाबत स्वतंत्र नियम लागू राहतील.
4. हिट विकेट नियम अधिक स्पष्ट
हिट विकेटसंबंधी असलेला संभ्रम दूर करण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. शॉट मारल्यानंतर संतुलन बिघडून फलंदाज स्वतः स्टंप्सवर पडल्यास तो बाद ठरेल. मात्र, फील्डरशी धडक झाल्याने स्टंप्स पडल्यास फलंदाज नॉटआऊट राहील. तसेच, फलंदाजाच्या हातातून सुटलेला बॅट थेट स्टंप्सवर लागल्यास तो हिट विकेट मानला जाईल.
5. बॉल आणि बॅटसाठी नवे मानक
महिला आणि ज्युनियर क्रिकेटसाठी चेंडूंचे तीन वेगवेगळे आकार निश्चित करण्यात आले आहेत. साइज-1 पुरुष क्रिकेटसाठी, साइज-2 महिला आणि ज्युनियर खेळाडूंसाठी, तर साइज-3 लहान वयाच्या खेळाडूंकरिता असेल. सर्व आकारांसाठी गुणवत्ता आणि सुरक्षिततेचे नियम समान राहतील.
1787 मध्ये स्थापन झालेला MCC हा क्रिकेटचे नियम ठरवणारा सर्वात जुना आणि प्रतिष्ठित क्लब आहे. आजही क्रिकेटच्या नियमांवर त्यांचाच अधिकार आहे. हे नवे बदल क्रिकेट अधिक न्याय्य, थरारक आणि आधुनिक बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहेत.