Firecracker Factory Explosion: राजस्थानची राजधानी जयपूरमधून एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. जयपूरमधील खोह-नागोरियन परिसरातील एका निवासी भागात असलेल्या बेकायदेशीर फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत आणि त्यानंतर झालेल्या स्फोटात किमान 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. एसएमएस (SMS) मेडिकल कॉलेजचे प्राचार्य आणि रुग्णालयाचे नियंत्रक डॉ. दीपक माहेश्वरी यांनी या मृतदेहांच्या संख्येला अधिकृत दुजोरा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी आयशा नगर तलाई कॉलनीतील एका छोट्या घरात हा अपघात झाला. या घरात छुप्या पद्धतीने आणि बेकायदेशीरपणे फटाक्यांचा मोठा साठा करून ठेवण्यात आला होता.
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्याकडून तीव्र दुःख व्यक्त
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या वेदनादायक अपघातावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. ‘एक्स’ (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत मुख्यमंत्री म्हणाले, “जयपूरच्या खोह-नागोरियन भागात झालेल्या अपघातातील जीवितहानी अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे. जिल्हा प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.” यासोबतच जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार पुरवण्याचे आणि पीडित कुटुंबांना सर्व शक्य ती मदत देण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
दोषींवर कडक कारवाई करण्याचे पोलीस आयुक्तांचे आश्वासन
जयपूरचे जिल्हाधिकारी संदेश नायक यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, घरात साठवून ठेवलेल्या अत्यंत ज्वलनशील पदार्थामुळे ही आग लागली असण्याची शक्यता आहे. मात्र, आगीचे नेमके आणि अचूक कारण सविस्तर तपासानंतरच स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, जयपूरचे पोलीस आयुक्त सचिन मित्तल यांनी स्पष्ट केले की, ज्या घरात हा स्फोट झाला, ते घर निवासी भागात बेकायदेशीरपणे गोदाम म्हणून वापरले जात होते आणि त्याच्या अगदी जवळच फटाके तयार करण्याचे केंद्रही सुरू होते. प्रथमदर्शनी हे साठवणूक केंद्र असल्याचे दिसत असून, तेथे साठवलेले साहित्य नेमके काय होते, याची खात्री फॉरेन्सिक (FSL) तपासणीनंतर होईल. या बेकायदेशीर कृत्यासाठी जबाबदार असलेल्या मालकावर आणि इतरांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
Rajasthan | At least seven people died in a fire incident at a firecracker factory in the Kho-Nagorian area of Jaipur: Dr Deepak Maheshwari, Principal of SMS Medical College and Controller of the hospital — ANI (@ANI) June 9, 2026
‘सिलिंडरसारखा मोठा आवाज झाला अन्…’; स्थानिक रहिवाशांनी सांगितला थरार
आग लागण्यापूर्वी नक्की काय घडले, याचा थरार स्थानिक रहिवाशांनी मांडला. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, सकाळी अचानक एकामागून एक स्फोटांचे आवाज ऐकू आले. स्थानिकांनी जीवाची पर्वा न करता तात्काळ पाण्याचा टँकर मागवला आणि होजपाईपच्या मदतीने घरात अडकलेल्या 3 ते 4 कामगारांना बाहेर काढून रुग्णालयात पाठवले.
गोदामाच्या शेजारीच राहणाऱ्या लियाकत नावाच्या नागरिकाने सांगितले की, सुरुवातीला गॅस सिलिंडर फुटल्यासारखा प्रचंड मोठा आवाज झाला आणि पाहता पाहता संपूर्ण इमारतीला आगीने वेढले. आगीनंतर जळालेल्या अवशेषांमध्ये फटाक्यांच्या नामांकित ब्रँडचे वेष्टन (रॅपर) सापडले आहे, ज्यावरून या निवासी भागात मोठ्या प्रमाणावर फटाके आणि दारूगोळा साठवला गेल्याचे स्पष्ट होते.