Manav Suthar Warwickshire : भारतीय क्रिकेट संघाचा युवा फिरकीपटू मानव सुथार याच्यासाठी सध्याचा काळ अत्यंत स्वप्नवत ठरत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताच आपल्या फिरकीच्या जादूने जागतिक क्रिकेटचे लक्ष वेधून घेणाऱ्या या 23 वर्षांच्या युवा खेळाडूला आता थेट परदेशी संघाने करारबद्ध केले आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात नुकत्याच पार पडलेल्या एकमेव ऐतिहासिक कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि 300 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयाचा खरा शिल्पकार ठरलेल्या मानव सुथारच्या फिरकी गोलंदाजीवर फिदा होत इंग्लंडच्या प्रसिद्ध 'वॉरविकशायर' कौंटी क्रिकेट क्लबने त्याला आपल्या संघात सामील करून घेतले आहे. यामुळे आता इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर भारताच्या या युवा फिरकीची जादू पाहायला मिळणार आहे.
पदार्पणातच 6 बळी आणि सामनावीर पुरस्कार; कौंटी क्रिकेटमध्ये पहिलीच वेळ
अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या मानव सुथारने पहिल्याच सामन्यात अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत अफगाण फलंदाजांना नाचवले. त्याने पहिल्या डावात अवघ्या 33 धावा खर्च करून 6 महत्त्वाचे बळी टिपले, तर दुसऱ्या डावात 1 बळी घेत सामन्यात एकूण 72 धावा देत 7 विकेट्स घेण्याची नेत्रदीपक कामगिरी केली. या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. मानवची हीच उत्कृष्ट कामगिरी पाहून बक्षीस म्हणून त्याला इंग्लंडच्या कौंटी क्रिकेटमध्ये खेळण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. 23 वर्षीय मानव सुथारच्या कारकिर्दीतील कौंटी क्रिकेट खेळण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.
हेही वाचा – Rohit Sharma: रोहित शर्मा पुन्हा मैदानात उतरणार? अफगाणिस्तान मालिकेआधी फिटनेसबाबत आली मोठी अपडेट
वॉरविकशायर क्लबची अधिकृत घोषणा; आयपीएलमध्ये गुजरात टायटन्समध्ये
या कराराची अधिकृत घोषणा करताना वॉरविकशायर काउंटी क्रिकेट क्लबने म्हटले आहे की, 'भारतीय फिरकीपटू मानव सुथारसोबत अल्प-मुदतीच्या करारावर स्वाक्षरी करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.' इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) हार्दिक पंड्या आणि शुभमन गिल यांच्या 'गुजरात टायटन्स' संघाचा भाग असलेल्या मानव सुथारनेही यावर आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, 'पुढील दोन कौंटी चॅम्पियनशिप सामन्यांसाठी वॉरविकशायर संघात सामील होण्यास मी प्रचंड उत्सुक आहे. इंग्लंडमधील परिस्थिती वेगळी असेल, पण मला विश्वास आहे की मी माझ्या फिरकीच्या जोरावर संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकेन.' मानवने आतापर्यंत खेळलेल्या 29 प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये तब्बल 129 बळी घेतले असून देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने स्वतःला सिद्ध केले आहे.
यॉर्कशायर आणि सॉमरसेटविरुद्ध खेळण्याची शक्यता; विजेतेपदाच्या शर्यतीत वॉरविकशायर आघाडीवर
इंग्लंडमधील कौंटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत वॉरविकशायरचा संघ सध्या विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. अशा मजबूत संघात सामील झालेला मानव सुथार आगामी यॉर्कशायर आणि सॉमरसेटविरुद्धच्या दोन महत्त्वाच्या सामन्यांमध्ये खेळताना दिसणार आहे. यातील यॉर्कशायरविरुद्धचा पहिला सामना 12 ते 15 जून दरम्यान स्कारबरो येथे खेळवला जाईल, तर त्यानंतरचा सॉमरसेटविरुद्धचा सामना टॉन्टनच्या मैदानावर पार पडणार आहे. भारताच्या या युवा फिरकीपटूने कसोटी पदार्पणात मिळालेल्या यशाचे मोठ्या संधीत रूपांतर केले असून, कौंटी क्रिकेटमधील हा अनुभव त्याला भविष्यात भारतीय संघात स्वतःचे स्थान पक्के करण्यासाठी अत्यंत मोलाचा ठरणार आहे.
हेही वाचा – ICC Test Rankings: आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठी उलथापालथ; 'या' भारतीय खेळाडूची टॉप-10 मध्ये झेप