Shreyas Iyer: BCCI कडून श्रेयस अय्यरवर मोठा दंड; पहिल्याच सामन्यातील चुकीची मोजावी लागली मोठी किंमत

गुजरातविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात 'स्लो ओव्हर-रेट' (षटकांचा संथ वेग) राखल्याबद्दल श्रेयस अय्यरवर 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Shreyas Iyer: BCCI कडून श्रेयस अय्यरवर मोठा दंड; पहिल्याच सामन्यातील चुकीची मोजावी लागली मोठी किंमत

Shreyas Iyer: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 च्या हंगामाला सुरुवात होताच पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरला बीसीसीआयच्या (BCCI) रोषाला सामोरे जावे लागले आहे. गुजरातविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात 'स्लो ओव्हर-रेट' (षटकांचा संथ वेग) राखल्याबद्दल श्रेयस अय्यरवर 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या आचारसंहितेनुसार, निर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्यामुळे तो दोषी आढळला असून आयपीएल प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे या कारवाईची माहिती दिली आहे.

पुन्हा तीच चूक: दंडाची टांगती तलवार
श्रेयस अय्यरसाठी 'स्लो ओव्हर-रेट'ची ही पहिलीच वेळ नाही. 2025 मध्ये पंजाब किंग्जचे कर्णधारपद स्वीकारल्यानंतर मागील हंगामातही त्याने दोनदा अशीच चूक केली होती. तेव्हा पहिल्या गुन्ह्यासाठी 12 लाख आणि दुसऱ्या गुन्ह्यासाठी 24 लाख रुपयांचा दंड त्याने भरला होता. आयपीएलच्या नियमांनुसार, षटकांचा वेग राखण्याची जबाबदारी प्रामुख्याने कर्णधाराची असते. त्यामुळे, आगामी सामन्यांमध्ये पंजाब संघाने पुन्हा हीच चूक केल्यास श्रेयसला दुप्पट दंड किंवा बंदीसारख्या कडक कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

मैदानावर मात्र पंजाबचा दणदणीत विजय
दंडात्मक कारवाईचा फटका बसला असला तरी, मैदानावर पंजाब किंग्जने आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली आहे. गुजरातविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात पंजाबने 3 गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातने 20 षटकांत 162 धावा केल्या होत्या. विजयासाठी मिळालेले 163 धावांचे लक्ष्य पंजाबने 19.1 षटकांत गाठले. या विजयात युवा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कूपर कोनोलीने (Cooper Connolly) 44 चेंडूंत 72 धावांची वादळी खेळी करून मुख्य भूमिका बजावली.

हेही वाचा – IPL 2026: 'अखेरच्या षटकात रंगला थरार!'; कूपर कॉनोली ठरला पंजाबचा संकटमोचक, रोमहर्षक सामन्यात गुजरात टायटन्सला चारली धूळ

गोलंदाजांची प्रभावी कामगिरी
फलंदाजीपूर्वी पंजाबच्या गोलंदाजांनीही शिस्तबद्ध कामगिरी केली. विजयकुमार वैशाकने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत 3 महत्त्वाचे बळी टिपले, तर अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहलने आपल्या 4 षटकांच्या कोट्यात केवळ 28 धावा खर्च करून 2 बळी मिळवत गुजरातच्या धावसंख्येला लगाम घातला. विजयाचा आनंद असला तरी, कर्णधार श्रेयस अय्यरला आता पुढील सामन्यांमध्ये रणनीतीसोबतच वेळेचे भान राखण्याचे मोठे आव्हान असेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number