ICC Women's T20 World Cup 2026: आयसीसी महिला टी20 विश्वचषक स्पर्धेच्या मध्य भागातच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताची अनुभवी खेळाडू श्रेयंका पाटील दुखापतीमुळे या अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धेतून बाहेर पडली आहे. मात्र, या संकटसमयी एका नव्या दमाच्या खेळाडू नशीब उजळले असून, नवोदित खेळाडू प्रेमा रावतचा थेट टी20 विश्वचषक संघात समावेश करण्यात आला आहे. आयसीसीच्या (ICC) इव्हेंट टेक्निकल कमिटीने श्रेयंकाच्या जागी लेग-स्पिनर प्रेमा रावतच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. प्रेमा आधीपासूनच इंडिया 'अ' संघाचा भाग म्हणून इंग्लंड दौऱ्यावर होती, तिथून ती आता थेट मुख्य वरिष्ठ संघात सामील होणार आहे.
अद्याप आंतरराष्ट्रीय पदार्पणाची प्रतीक्षा
24 वर्षीय लेग-स्पिनर प्रेमा रावतला अद्याप भारतीय सीनियर संघाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण (Debut) करण्याची संधी मिळालेली नाही. परंतु, देशांतर्गत क्रिकेटमध्ये तिने सातत्याने केलेल्या चमकदार कामगिरीमुळे निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले होते. याशिवाय, महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL) रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाकडून खेळताना तिने आपली चमक दाखवली. याच कामगिरीच्या जोरावर तिची महिला आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेसाठी निवड झाली होती. या स्पर्धेत इंडिया 'अ' संघाचे प्रतिनिधित्व करताना प्रेमाने अत्यंत किफायतशीर गोलंदाजी करत 8 बळी घेतले होते.
आरसीबी (RCB) आणि डब्ल्यूपीएलमधील कामगिरीचा आलेख
WPL मधील प्रेमा रावतच्या प्रवासावर नजर टाकल्यास, तिने आरसीबीसाठी आतापर्यंत एकूण 6 सामने खेळले आहेत. तिने 2024-25 च्या हंगामात 3 आणि 2025-26 च्या हंगामात 3 सामने खेळले. या 6 सामन्यांमध्ये तिला एकूण 3 विकेट्स घेता आल्या आहेत. डब्ल्यूपीएलमध्ये तिची गोलंदाजीची सरासरी 20.33 असून इकॉनॉमी रेट 10.16 इतका आहे. आता विश्वचषकासारख्या मोठ्या मंचावर तिला अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान मिळते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
श्रेयंका पाटीलच्या दुखापतीवर आयसीसीचे अधिकृत निवेदन
श्रेयंका पाटीलच्या जागी बदली खेळाडू घेण्यास मंजुरी देताना आयसीसीने स्पष्ट केले की, महिला टी-20 विश्वचषक 2026 समितीने प्रेमा रावतच्या समावेशाला मान्यता दिली आहे. बुधवारी नेदरलँड्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना श्रेयंकाच्या उजव्या घोट्याला गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे ती संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.