Tiger Inside House : महाराष्ट्राप्रमाणेच मध्य प्रदेशातही सध्या मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. वाघांच्या संख्येच्या बाबतीत मध्य प्रदेश देशात पहिल्या क्रमांकावर आहे, तर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी आहे. मात्र, वाघांची ही वाढती संख्या आता वस्त्यांच्या जवळ येत असून, सोमवारी बांधवगड व्याघ्र प्रकल्पाजवळील बेलडी गावात एका वाघाने चक्क घरात घुसून खाटेवर ठिय्या मांडल्याने खळबळ उडाली.
वाघ गावात शिरला आणि थेट घरात घुसला..
सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास उमरिया जिल्ह्यातील बेलडी गावातील शेतात वाघ दिसल्याने घबराट पसरली. वनविभागाला 10:30 वाजता कळवूनही वाघ दुपारपर्यंत शेतातच होता. दुपारी 12:30 वाजता हा वाघ शेतातून बाहेर पडला आणि थेट गावाच्या दिशेने धावला. गावात येताच समोर आलेल्या गोपाल कोल नावाच्या तरुणावर चवताळलेल्या वाघाने झडप घातली. वाघाच्या हल्ल्यात गोपालच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीने उपचारासाठी कटनी येथे हलवण्यात आले आहे.
जेव्हा घरातल्या खाटेवर वाघ ‘आराम’ करतो..
हल्ल्यानंतर हा वाघ दुर्गा प्रसाद द्विवेदी यांच्या घरात घुसला. घरात कोणी नसल्याचे पाहून वाघ थेट एका खाटेवर जाऊन बसला. हा नजारा पाहून गावकरी प्रचंड हादरले. जीवाच्या भीतीने अनेकांनी घराची छते गाठली आणि तिथूनच परिस्थितीवर लक्ष ठेवू लागले. गावकऱ्यांनी वाघाला हुसकावण्यासाठी दगडफेक केली आणि काठ्यांचा वापर केला; मात्र, निवांत विश्रांती घेण्याच्या मूडमध्ये असलेल्या वाघाने घराचा ताबा सोडला नाही.
आठ तासांची मॅरेथॉन बचाव मोहीम
घटनेची माहिती मिळताच पानपाठा बफर झोनमधील बचाव पथक, डॉक्टर आणि तज्ज्ञांची टीम घटनास्थळी दाखल झाली. सुमारे 8 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर, सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास वाघाला सुरक्षितपणे गुंगीचे इंजेक्शन देऊन जेरबंद करण्यात आले. या मोहिमेनंतर गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
का वाढतोय मानव-वन्यजीव संघर्ष?
बांधवगड व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक पी.के. वर्मा यांनी सांगितले की, या परिसरात वाघांचा वावर नेहमीचाच आहे. गर्दी पाहून वाघ अनेकदा घाबरतात आणि स्वसंरक्षणासाठी मानवी वस्तीकडे धाव घेतात. यावेळीही एक मादी वाघीण गावात शिरल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या भागात वन्यप्राणी वारंवार दिसत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून वन्यजीव व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.