Makar Sankranti 2026 : हिंदू धर्मात मकर संक्रांतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा हा सण साजरा केला जातो. या वर्षी, म्हणजेच 2026 मध्ये, मकर संक्रांतीच्या तारखेबाबत लोकांमध्ये काहीसा गोंधळ असला तरी, पंचांगानुसार सूर्य 14 जानेवारी 2026, बुधवारी दुपारी 3 वाजून 13 मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे बुधवारीच संक्रांत साजरी करणे शास्त्रोक्त ठरेल. संक्रांतीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते, ज्याला 'देवांचा दिवस' मानले जाते.
पुण्यकाळ आणि महापुण्यकाळाची वेळ
मकर संक्रांतीला स्नान आणि दान करण्यासाठी पुण्यकाळ हा सर्वात शुभ मुहूर्त मानला जातो. या वर्षीचा पुण्यकाळ आणि महापुण्यकाळ खालीलप्रमाणे असेल:
पुण्यकाळ मुहूर्त: दुपारी 3 वाजून 13 मिनिटांपासून ते संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटांपर्यंत.
महापुण्यकाळ: दुपारी 3 वाजून 13 मिनिटांपासून ते संध्याकाळी 4 वाजून 58 मिनिटांपर्यंत. या कालावधीत केलेले दान आणि जप-तप अत्यंत फलदायी मानले जाते. सूर्याचे संक्रमण दुपारी होत असल्यामुळे, 14 जानेवारीलाच सर्व धार्मिक विधी करणे लाभदायक ठरेल.
23 वर्षांनंतरचा दुर्मीळ योगायोग: षटतिला एकादशी
यंदाच्या मकर संक्रांतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याच दिवशी 'षटतिला एकादशी' देखील येत आहे. असा दुर्मीळ योग तब्बल 23 वर्षांनंतर जुळून आला आहे; यापूर्वी 2003 मध्ये असा योग आला होता. षटतिला एकादशीला तिळाचा सहा प्रकारे वापर (स्नान, उटणे, तर्पण, दान, भक्षण आणि हवन) करण्याचे विधान आहे. संक्रांती आणि एकादशी एकाच दिवशी आल्याने या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व कैक पटीने वाढले आहे. मात्र, एकादशी असल्यामुळे या दिवशी खिचडीचे सेवन न करता केवळ दान करणेच योग्य ठरेल, असे तज्ज्ञ सांगतात.
संक्रांतीला काय करावे आणि कशाचे दान द्यावे?
संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून तीळ मिश्रित पाण्याने स्नान करावे आणि सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. या दिवशी गरीब आणि गरजूंना तीळ, गूळ, नवीन धान्य, ब्लँकेट (कांबळी) आणि वस्त्रांचे दान करणे विशेष शुभ मानले जाते. 'तीळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला' असे म्हणत एकमेकांशी असलेले स्नेहसंबंध दृढ करण्याची ही वेळ असते. तसेच, या दिवशी श्रीमद्भगवद्गीतेचे वाचन करणे आणि सूर्याच्या मंत्रांचा जप करणे मानसिक शांततेसाठी उत्तम मानले जाते.