Kavya Maran Wedding: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2026) मधील 'सनरायझर्स हैदराबाद' (SRH) या प्रसिद्ध फ्रँचायझीची सीईओ आणि कोट्यवधी चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेली काव्या मारन लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. सुमारे 18000 कोटी रुपयांच्या 'सन ग्रुप' सम्राज्याची वारसदार असलेल्या काव्याच्या लग्नाच्या वृत्तामुळे तिच्या असंख्य चाहत्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडमध्ये आपल्या संगीताची जादू पसरवणारा प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अनिरुद्ध रविचंदर याच्यासोबत काव्या साताजन्माची गाठ बांधणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडिया आणि राजकीय-क्रीडा वर्तुळात सुरू आहे.
अनिरुद्धच्या मामांनी केला मोठा खुलासा; चर्चांवर अखेर शिक्कामोर्तब
काव्या मारन आणि अनिरुद्ध यांच्या अफेअरच्या चर्चा गेल्या 1 ते 2 वर्षांपासून सुरू होत्या. यापूर्वी अशा बातम्या आल्या तेव्हा गायकाच्या टीमने त्या निव्वळ अफवा असल्याचे सांगत फेटाळून लावल्या होत्या. मात्र, आता अनिरुद्धचे सख्खे मामा आणि ज्येष्ठ अभिनेते वाय. जी. महेंद्रन यांनी दिलेल्या एका मुलाखतीमुळे या नात्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे. महेंद्रन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना या लग्नाच्या वृत्ताला थेट दुजोरा दिला असून, या भावी जोडप्याला त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
दरम्यान, 'केपीटीव्ही' (KPTV) ला दिलेल्या मुलाखतीत अनिरुद्धच्या लग्नाबाबत बोलताना वाय. जी. महेंद्रन म्हणाले, "माझ्या माहितीनुसार अनिरुद्ध आणि काव्या मारन यांचे लग्न जवळपास निश्चित झाले आहे. अनिरुद्ध अत्यंत समजूतदार असून तो एका अत्यंत प्रतिष्ठित आणि मोठ्या कुटुंबाचा जावई बनणार आहे." काव्याचे कौतुक करताना ते पुढे म्हणाले की, "काव्या ही अत्यंत सक्षम महिला असून तिच्याकडे आयपीएलमधील इतक्या मोठ्या संघाचे यशस्वी व्यवस्थापन करण्याचे कौशल्य आहे. व्यवसायाचे बाळकडू तिला तिच्या वडिलांकडूनच मिळाले आहे. या दोघांची जोडी अत्यंत देखणी असून त्यांनी भविष्यात संगीत व्यवसायातही एकत्र काम करायला हवे."
सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट ठरली खरी; चाहत्यांना लग्नाच्या तारखेची उत्सुकता
तथापि, काव्या आणि अनिरुद्ध यांच्यातील जवळीक नवीन नाही. वर्ष 2025 मध्ये 'रेडिट' (Reddit) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका युझरने पोस्ट करत दावा केला होता की, हे दोघे गेल्या वर्षभरापासून एकमेकांना गुपचूप डेट करत आहेत. तेव्हापासूनच या दोघांच्या लग्नाचे तर्कवितर्क लावले जात होते. दरम्यान, हा विवाह सोहळा नेमका कधी आणि कोणत्या ठिकाणी पार पडणार, याबाबत मारन किंवा रविचंदर कुटुंबाकडून अजूनही कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. तरीही, या ग्रँड वेडिंगची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.