Girl Ends Her Life in Jaipur due to School Bullying : जयपूरमधील एका नामांकित खासगी शाळेतून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या एका नऊ वर्षांच्या विद्यार्थीनीने शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या (Suicide) केली. वर्गातील मुला-मुलींकडून होणारा त्रास, टिंगल-टवाळी आणि छळ असह्य झाल्यामुळे मुलीने हे टोकाचे पाऊल उचलले, असा गंभीर आरोप मुलीच्या पालकांनी शाळेच्या प्रशासनावर केला आहे. ही दुःखद घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती, ज्यात उडी मारण्यापूर्वी विद्यार्थिनी रेलिंगवर चढताना दिसत होती.
शिक्षकांवर असंवेदनशीलतेचा आरोप
नीरजा मोदी या विद्यार्थिनीने 1 नोव्हेंबरला शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. 48 फूट उंचीवरून खाली पडून मुलीचा जागीच मृत्यू झाला. ज्या दिवशी विद्यार्थिनीने आत्महत्या केली, त्या दिवशीही वर्गातील मुलांनी तिला त्रास दिला होता. मुलीच्या आई शिवानी यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, मुलीने वर्गातील मुलांच्या त्रासाची तक्रार शिक्षिकेकडे किमान चार वेळा केली होती.
पालकांचे म्हणणे काय?
शिवानी यांनी सांगितले की, "काही मुले तिचा सतत अपमान करत होते. तिचे नाव दुसऱ्या मुलाशी जोडून तिची छेड काढायचे. आम्ही याप्रकरणी शिक्षिकेशी संपर्क साधला होता, पण शिक्षिका खूपच असंवेदनशील होती."
मागील वर्षापासून छळ सुरू
वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षकांना छळाबद्दल वारंवार माहिती दिली होती, तरीही छळ सुरूच होता. मागच्या वर्षीही मुलीचा छळ झाला होता आणि यावर्षीही तेच विद्यार्थी वर्गात असल्याने तो प्रकार सुरूच राहिला. आई शिवानी यांनी सांगितले की, त्यांनी मागच्या वर्षीही एक-दोनदा तक्रार दिली होती. तसेच, मुख्याध्यापिका इंदू मॅडम यांनाही याबद्दल माहिती दिली होती.
शिक्षकांचे नेहमीच दुर्लक्ष
मुलीचे वडील विजय यांनी सांगितले की, एकदा पालक-शिक्षक सभेत (PTM) त्यांच्या समोरच त्यांच्या मुलीच्या वर्गातील एक मुलगा तिला काहीतरी इशारा करत असल्याचे त्यांनी पाहिले. वर्गशिक्षकाशी बोलल्यावर शिक्षकांनी उत्तर दिले की, 'अमायरालाही समजायला हवे की, या शाळेत मुले आणि मुली एकत्र शिकत आहेत.'
सीसीटीव्ही फुटेजमधून छळाची पुष्टी
मुलीचे काका साहिल यांनी म्हटले आहे की, वर्गातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पुढे बसलेली मुले मागे वळून आमच्या मुलीची छेड काढताना स्पष्ट दिसत आहेत. याबद्दल मुलीने शिक्षिकेकडे दोन वेळा तक्रारही दिल्याचे दिसत आहे.
मुलीने तक्रार दिल्याचे शिक्षकांनी मान्य केले
मृत मुलीने अनेकदा तक्रार केली असल्याचे शिक्षिकेने मान्य केले आहे. तरीही त्यांनी त्यावेळी त्यात हस्तक्षेप केला नाही. "तुम्ही मुलांच्या वेदना अशा प्रकारे हाताळता का?" असा संतप्त सवाल मुलीच्या काकांनी विचारला.
चौकशीवर असमाधान
मुलीच्या वडिलांनी पोलिसांच्या तपासावर असमाधान व्यक्त केले आहे. विजय म्हणाले, "पोलिसांकडून फारशी हालचाल होताना दिसत नाही. शाळा खूप शक्तीशाली आणि प्रभावशाली आहे, त्यामुळे हे प्रकरण धीम्या गतीने सुरू आहे. जर पोलिसांनी वर्गात उपस्थित 20 विद्यार्थी आणि शिक्षकांची योग्यरीत्या चौकशी केली, तर सर्व काही सत्य स्पष्ट होईल."