Influencer Marketing India: डिजिटल क्रांतीच्या लाटेत भारतातील प्रभावक (Influencer) उद्योग अभूतपूर्व वेगाने पुढे सरकत आहे. मोबाईल इंटरनेटचा प्रसार, रील्सची लोकप्रियता आणि कंपन्यांची डिजिटल जाहिरातीत वाढती गुंतवणूक यामुळे इन्फ्लुएन्सर्स बाजारपेठ आता तब्बल 10,000 कोटींच्या वर गेल्याचे समोर आले आहे. एका रीलमधून लाखो रुपये कमावणारे लहान निर्माते आता या उद्योगाचे नवे पॉवर प्लेअर ठरत आहेत.
मागील अंदाजांपेक्षा तिप्पट वाढ
प्रभावक मार्केटिंग SaaS प्लॅटफॉर्म KlugKlug च्या नव्या अहवालानुसार, भारतातील प्रभावक बाजारपेठेचा एकूण आकार आता 10,000 कोटींच्या आसपास आहे. आतापर्यंत हा आकडा फक्त 3000-4000 कोटींमध्ये राहील असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, प्रत्यक्षात प्रभावक मार्केटिंगचा विस्तार अपेक्षेपेक्षा मोठा आणि वेगवान असल्याचे अहवालातून दिसत आहे.
हेही वाचा – Gold Price Today: सोन्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर; आजचे दर पाहून थक्क व्हाल
लहान निर्मात्यांचा मोठा प्रभाव
ब्रँड प्रमोशनच्या जगात मायक्रो आणि नॅनो इन्फ्लुएंसर्स सर्वाधिक प्रभावी ठरत आहेत. मोठ्या सेलिब्रिटी इन्फ्लुएंसर्सपेक्षा ते ग्राहकांशी अधिक जवळचा आणि विश्वासू संवाद साधतात, त्यामुळे कंपन्यांना थेट लक्ष्य ग्राहकांपर्यंत पोहोचणे सोपे जाते. परिणामी, अनेक ब्रँड आता मोठ्या नावांपेक्षा छोट्या क्रिएटर्सकडे वळत आहेत. अहवालानुसार, प्रभावक मार्केटिंगवर होणाऱ्या एकूण खर्चापैकी 75 टक्के रक्कम थेट ब्रँड आणि इन्फ्लुएंसर्समध्ये देवाणघेवाण केली जाते. त्यामुळे या व्यवहारांचे अचूक आर्थिक ट्रॅकिंग कठीण ठरते. फक्त 25 टक्के व्यवहार एजन्सीद्वारे होत असल्याने अधिकृत आकडे मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहेत.
जाहिरातींच्या पद्धतीत मोठा बदल
दरम्यान, D2C ब्रँड्स दरवर्षी इन-हाऊस क्रिएटिव्ह टीमवर 200 दशलक्षहून अधिक खर्च करत आहेत. कंपन्या स्वतःच्या व्हिडिओ आणि कंटेंट प्रोडक्शन युनिट्स उभ्या करत असून, पारंपरिक जाहिरात एजन्सींवरील अवलंबित्व झपाट्याने कमी होत आहे. रील्स, शॉर्ट व्हिडिओ आणि कंटेंट क्रिएशनमधील वाढ हे जाहिरात क्षेत्रातील बदलत्या ट्रेंडचे प्रमुख उदाहरण मानले जात आहे. भारतातील इन्फ्लुएन्सर्स उद्योग आता केवळ मनोरंजनाचे साधन न राहता मोठी आर्थिक शक्ती बनत आहे. डिजिटल कंटेंटची मागणी वाढत असताना, येत्या काही वर्षांत हा बाजार आणखी वेगाने वाढेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.