Akash Chaudhary: भारतीय क्रिकेटमध्ये आज एक अभूतपूर्व कामगिरी घडली आहे. रणजी ट्रॉफीच्या सामन्यात मेघालयचा आक्रमक फलंदाज आकाश कुमार चौधरी याने केवळ काही मिनिटांत सर्वांचे लक्ष वेधले. अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्याने सलग 8 चेंडूत 8 षटकार ठोकत नवा विश्वविक्रम रचला आणि क्रिकेटप्रेमींना थक्क केले.
हेही वाचा – IPL – WPL Auction: ठरलं तर मग! IPL आणि WPL 2026 साठी खेळांडूंचा लिलाव होणार या तारखांना
दरम्यान, 126 व्या षटकात स्पिनर लिमार डॅबीच्या गोलंदाजीवर आकाशने सलग सहा षटकार मारले, त्यानंतर पुढील षटकात दोन षटकार ठोकत त्याने इतिहास रचला. प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात असे करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर, आकाशने फक्त 11 चेंडूत अर्धशतक झळकावून सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम आपल्या नावावर केला. यापूर्वी हा विक्रम 2012 मध्ये इंग्लंडच्या वेन नाईटकडे (12 चेंडू) आणि 1965 मध्ये क्लाइव्ह इनमनकडे (13 चेंडू) होता.
आकाशची खेळी संपली तेव्हा तो फक्त 14 चेंडूत 50 धावांवर होता, ज्यात 8 षटकारांचा समावेश होता. त्याच्या या धडाकेबाज खेळीमुळे मेघालयने आपला डाव 628 धावांवर घोषित केला. त्याआधी अर्पित भटेवारने 207 धावा, तर राहुल दलाल आणि किशन लिंगडोह यांनी शतके झळकावली. यानंतर अरुणाचल प्रदेशचा संघ फक्त 73 धावांत गारद झाला. मेघालयने पहिल्या डावात तब्बल 555 धावांची आघाडी घेत या सामन्यात वर्चस्व मिळवले आहे.