India GDP in Next 2 Years : जागतिक गुंतवणूक बँक गोल्डमन सॅक्सने (Goldman Sachs) भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत एक अतिशय सकारात्मक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, आगामी दोन वर्षांत भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान टिकवून ठेवणार आहे. जागतिक आव्हाने असतानाही भारताचा विकासदर जागतिक सरासरीपेक्षा कितीतरी पटीने सरस असेल, असे बँकेने म्हटले आहे.
GDP वाढीचा नेमका अंदाज काय?
गोल्डमन सॅक्सच्या मॅक्रोइकोनॉमिक अहवालानुसार, भारताचा GDP वाढीचा दर 2026 मध्ये सुमारे 6.7 टक्के आणि 2027 मध्ये 6.8 टक्के राहण्याची शक्यता आहे. अनेक विकसित देशांची अर्थव्यवस्था मंदावली असताना भारताचा हा विकासदर देशाचा भक्कम आर्थिक पाया आणि वाढती शक्ती दर्शवतो.
जागतिक स्थिती आणि भारताचे वेगळेपण
2026 मध्ये जागतिक अर्थव्यवस्था 2.8 टक्क्यांच्या दराने वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महागाई कमी होणे आणि आर्थिक बाजारपेठा सामान्य होणे यामुळे जागतिक स्तरावर सुधारणा होईल. मात्र, भारताचा विकास हा प्रामुख्याने देशांतर्गत मागणी, सरकारी गुंतवणूक आणि सातत्याने होणाऱ्या सुधारणांवर आधारित आहे. भारत हा केवळ निर्यातीवर अवलंबून नसल्यामुळे जागतिक मागणीतील चढ-उतारांचा भारतीय अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होत नाही.
गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी
देशातील मोठी बाजारपेठ, वाढता खर्च आणि पायाभूत सुविधांवरील सरकारी गुंतवणूक यांमुळे आर्थिक घडामोडींना वेग मिळत आहे. विशेषतः ऊर्जा, लॉजिस्टिक्स, वाहतूक आणि डिजिटल क्षेत्रात होणाऱ्या गुंतवणुकीमुळे उत्पादकता वाढत असून खाजगी गुंतवणूकही मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे. यामुळे नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि देशाची मॅन्युफॅक्चरिंग क्षमता तसेच सप्लाय चेन अधिक मजबूत होईल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जोखीम आणि संभाव्य आव्हाने
जागतिक व्यापारातील धक्क्यांचा भारतावर मर्यादित परिणाम होईल, कारण देशांतर्गत मागणी हे भारताचे सुरक्षा कवच आहे. तरीही, भू-राजकीय तणाव आणि विकसित देशांमधील रोजगार निर्मितीचा मंद वेग ही काही आव्हाने कायम आहेत. जर रोजगाराच्या संधी कमी झाल्या, तर त्याचा परिणाम लोकांच्या खरेदी क्षमतेवर आणि गुंतवणुकीवर होऊ शकतो. मात्र, भारताचे 'डोमेस्टिक ग्रोथ मॉडेल' या धोक्यांपासून अर्थव्यवस्थेचे संरक्षण करण्यास सक्षम आहे.
हेही वाचा – Punjab National Bank : पीएनबीला 2434 कोटींचा चुना! कशी झाली इतक्या मोठ्या रकमेची अफरातफर?