IND vs PAK: अंडर-19 आशिया कप 2025चा अंतिम सामना आता अधिकच थरारक ठरणार आहे. क्रिकेटप्रेमींची उत्कंठा शिगेला पोहोचली असून, अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. उपांत्य फेरीतील सामने जिंकत दोन्ही संघांनी अंतिम सामन्यात आपले स्थान पक्के केले आहे.
भारताने श्रीलंकेवर 8 विकेट्सने मात केली
आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने उपांत्य फेरीत श्रीलंकेचा 8 विकेट्सने पराभव केला. मुसळधार पावसामुळे सामना 50 षटकांऐवजी 20 षटकांचा करण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 20 षटकांत 138 धावा केल्या. 139 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अडखळती ठरली. कर्णधार आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी लवकर बाद झाल्यामुळे संघ अडचणीत सापडला. मात्र त्यानंतर आरोन जॉर्ज आणि विहान मल्होत्रा यांनी जबाबदारी घेत संघाला विजयाकडे नेले.
आरोन जॉर्ज आणि विहान मल्होत्राची दमदार भागीदारी
आरोन जॉर्जने 48 चेंडूत 54 धावांची नाबाद खेळी केली, ज्यात 3 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. तर विहान मल्होत्राने 45 चेंडूत 61 धावा करत 4 चौकार आणि 2 षटकार ठोकले. दोघांनीही अर्धशतक झळकावत कोणताही गडी न गमावता भारताला विजय मिळवून दिला.
पाकिस्तानचा बांगलादेशवर सहज विजय
दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तानने बांगलादेशचा 8 विकेट्सने पराभव केला. पावसामुळे हा सामना 27 षटकांचा करण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा संघ 121 धावांत सर्वबाद झाला. त्यानंतर पाकिस्तानने केवळ 16.3 षटकांत 2 विकेट्स गमावत लक्ष्य गाठले.
रविवारी रंगणार महासामना
दरम्यान, अंडर-19 आशिया कप 2025चा अंतिम सामना रविवारी खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. याआधीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. त्यामुळे आता अंतिम फेरीतही टीम इंडिया विजयाची पुनरावृत्ती करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. क्रिकेटप्रेमींसाठी हा सामना पाहणे म्हणजे एक प्रकारची पर्वणीचं ठरणार आहे.