घरातील वादाचा राग एका दोन वर्षांच्या चिमुकलीवर काढल्याची अतिशय धक्कादायक घटना छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातून समोर आली आहे. कौटुंबिक वादादरम्याच आपल्याच चुलत्याने चक्क 2 वर्षांच्या भाचीला जळत्या लाकडी चुलीवर बसवल्याचा आरोप केला गेला आहे. याच घटनेत गंभीररीत्या भाजलेल्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृ्त्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी चुलता नितीन कुमार लोनिया याला अटक केली आहे.
राक्षस बनला चुलता
ही संपूर्ण घटना बिलासपूर जिल्ह्यातील कोनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घुटकू या गावात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन कुमार लोनिया याचे त्याची भावजय अंकितासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली. अंकिता ही पती सुधिर आणि दोन वर्षांच्या चिमुकलीसोबत राहत होती. 26 ऑगस्ट रोजी अंकिता आपल्या चिमुकलीला घेऊन नितीनसोबत घरातून निघून गेली. बेराच वेळ झाला तरी तिघांचा ठावठिकाणा लागला नाही, त्यामुळेच चिमुकलीच्या आजोबांनी कोनी पोलीस ठाण्यात तातडीने तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला.
7 सप्टेंबर रोजी नितीन, अंकिता आणि चिमुकली हे घुटकू गावात परतल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पुन्हा त्यांच्या कुटुंबातील वाद वाढला. मंगळवारी नितीनचा मोठा भाऊ सुधीरसोबत जोरदार वाद झाला. काही वेळानंतर नितीन आणि अंकिता या दोघांमध्येही वाद झाला. या वादाची माहिती मिळताच कोनी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. हस्तक्षेप करुन घरातील निर्माण झालेली भांडणांती परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान नितीनने दोन वर्षांच्या चिमुकलीला लाकडी चुलीवर बसवल्याचा आरोप करण्यात येत आहे.
चिमुकलीचा करुण अंत
या धक्कादायक घटनेत चिमुकली गंभीररीत्या भाजली गेली होती. पोलिसांनी तिला कोणताही वेळ वाया न जाता रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्याच तिची प्रकृती खालावली. अखेर रात्री उशिरा चिमुकलीचा मृ्त्यू झाला. या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी नितीन कुमार लोनिया याला अटक केली असून या घटनेमागील घटनाक्रमाचा तपास करण्यात येत आहे.