IND vs ENG: अंडर-19 विश्वचषक 2026 चा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, येत्या 6 फेब्रुवारी रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात हरारे स्पोर्ट्स क्लब येथे महाअंतिम सामना खेळवला जाणार आहे. या संपूर्ण स्पर्धेत दोन्ही संघांनी आपला अपराजित प्रवास कायम ठेवला आहे. अंडर-19 विश्वचषकाचा हा 16 वा हंगाम असून, भारताने यापूर्वी 5 वेळा ट्रॉफी जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे अंतिम सामन्यापूर्वी इंग्लंडवर मोठा मानसिक दबाव असण्याची शक्यता आहे.
टीम इंडियाचे 'मिशन 6'; पाच वेळा कोरले जेतेपदावर नाव
भारतीय संघाने 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक 5 वेळा विश्वविजेतेपद पटकावले आहे. भारताने पहिल्यांदा 1999-2000 मध्ये ही ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर 2007-08, 2012, 2017-18 आणि 2021 मध्ये भारतीय संघ चॅम्पियन ठरला. यंदाच्या 2026 च्या स्पर्धेतही टीम इंडियाने गट फेरीपासून ते उपांत्य फेरीपर्यंत उत्कृष्ट खेळ केला आहे. विशेष म्हणजे, अफगाणिस्तानविरुद्धच्या उपांत्य फेरीत भारताने विक्रमी धावांचा यशस्वी पाठलाग करून नवा इतिहास रचला आहे.
इंग्लंडचा 28 वर्षांपासूनचा दुष्काळ संपणार का?
दुसरीकडे, इंग्लंडच्या संघाला आजवर केवळ 1 वेळा ही ट्रॉफी जिंकता आली आहे. त्यांनी 1997-98 मध्ये आपले पहिले आणि एकमेव विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर 2022 मध्ये इंग्लंडचा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता, मात्र त्यावेळी भारताने त्यांचा 4 गडी राखून पराभव केला होता. आता तब्बल 28 वर्षांनंतर पुन्हा एकदा जेतेपद मिळवण्यासाठी इंग्लिश संघ सज्ज झाला आहे, परंतु त्यांच्यासमोर भारताचे कठीण आव्हान असणार आहे.
विश्वचषकातील इतर संघांचे रिपोर्ट कार्ड
विश्वचषकाच्या इतिहासात ऑस्ट्रेलिया हा भारतांनंतरचा सर्वात यशस्वी संघ आहे, ज्यांनी 4 वेळा ही ट्रॉफी जिंकली आहे. मात्र, यंदाच्या स्पर्धेत त्यांचा प्रवास उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभूत झाल्याने संपला. पाकिस्तानने 2 वेळा जेतेपद मिळवले असून दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि बांगलादेश या संघांनी प्रत्येकी 1 वेळा ही ट्रॉफी आपल्या नावे केली आहे.