FIFA World Cup 2026 Prize Money: फुटबॉल चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून क्रीडा विश्वातील सर्वात महाकाय स्पर्धा म्हणजेच 'फिफा विश्वचषक 2026' चा थरार 11 जून पासून सुरू होत आहे. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या 3 देशांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेत यंदा पहिल्यांदाच तब्बल 48 संघ विजेतेपदासाठी आमनेसामने असतील. या सर्व संघांची प्रत्येकी 4 संघांच्या प्रमाणे 12 गटांमध्ये (Groups) विभागणी करण्यात आली आहे. पुढील 39 दिवस चालणाऱ्या या भव्य क्रीडा उत्सवात 16 वेगवेगळ्या शहरांमध्ये अंतिम सामन्यासह एकूण 104 सामने खेळवले जातील. या स्पर्धेचा थरार सुरू होण्यापूर्वीच फिफाने (FIFA) बक्षीस रकमेत सुमारे 50 टक्क्यांची घसघशीत वाढ करत खेळाडूंना आणि फुटबॉल बोर्डांना मोठे गिफ्ट दिले आहे.
बक्षीस रकमेचा महाफंड; उपविजेत्यालाही मिळणार 314 कोटी रुपये
यंदाच्या विश्वचषकासाठी फिफाने एकूण 655 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार तब्बल 6,241 कोटी रुपयांच्या एकूण बक्षीस रकमेची घोषणा केली आहे. यामध्ये मागील विश्वचषकाच्या तुलनेत 50 टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. यातील सर्वात मोठा हिस्सा अर्थातच चॅम्पियन ठरणार्या संघाला मिळणार आहे. विश्वचषक उंचावणार्या विजेत्या संघाला 50 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच जवळपास 476 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळतील. तर अंतिम सामन्यात पराभूत होणाऱ्या उपविजेत्या संघाला 33 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 314 कोटी रुपयांवर समाधान मानावे लागेल.
तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघांनाही कोट्यवधींची लॉटरी
फिफाने केवळ अंतिम फेरीतील संघांवरच नाही, तर सेमीफायनल आणि क्वार्टर फायनलपर्यंत मजल मारणाऱ्या संघांवरही पैशांचा पाऊस पाडला आहे. या स्पर्धेत तिसरे स्थान पटकावणाऱ्या संघाला 276 कोटी रुपये आणि चौथ्या स्थानावरील संघाला 257 कोटी रुपये दिले जातील. याशिवाय, 5 व्या ते 8 व्या स्थानावर राहणाऱ्या प्रत्येक संघाला 181 कोटी रुपये, तर 9 व्या ते 16 व्या स्थानावरील संघांना प्रत्येकी 143 कोटी रुपये मिळतील. तसेच 17 व्या ते 32 व्या क्रमांकावर असणाऱ्या प्रत्येक संघाला 105 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल.
शेवटच्या 48 व्या क्रमांकावरील संघालाही मिळणार 86 कोटी
यंदाच्या फिफा विश्वचषकाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला रिकाम्या हाताने परतावे लागणार नाही. ग्रुप स्टेजमधून बाहेर पडणाऱ्या, म्हणजेच अगदी 33 व्या स्थानापासून ते थेट शेवटच्या 48 व्या स्थानावर राहणाऱ्या प्रत्येक संघाला फिफाकडून प्रत्येकी 86 कोटी रुपये दिले जाणार आहेत. याव्यतिरिक्त, स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या सर्व 48 संघांना केवळ पात्रतेसाठी प्रत्येकी 10 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स दिले जातील. हा सर्व खर्च आणि इतर भत्ते एकत्र केले, तर फिफाचा या विश्वचषकावरील एकूण बक्षीस आणि निधीचा खर्च तब्बल 8,299 कोटी रुपयांच्या घरात जाणार आहे.